पाणी असूनही पिके तहानलेली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी असूनही पिके तहानलेली
पाणी असूनही पिके तहानलेली

पाणी असूनही पिके तहानलेली

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. १२ : ‘महापारेषण’च्या जेजुरी (ता. पुरंदर) सबस्टेशनमधून विजेच्या पारेषणाच्या कामात गेल्या चार वर्षांपासून अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात वीजपंपधारक शेतकऱ्यांना लोडशेडींगचा सामना करावा लागत आहे. वारंवार अनिश्चित काळासाठी वीज गायब होत असल्याने विहिरीत पाणी असूनही पिके तहानलेलीच राहात आहेत. शिवाय वीज सतत कमी दाबाने मिळत असल्याने घोटाळ्यांचे प्रमाणही वाढले आहे.
उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने विजेची मागणी वाढली आहे. दुसरीकडे पुरवठा कमी होत असल्याने वीजवाहक प्रणालीमध्ये वारंवार घोटाळे होत आहेत. त्यामुळे वीज खंडित होणे, कमी दाबाने वीज मिळणे, फ्यूज उडणे याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय काही फीडर सोडवून ठेवावे लागत आहेत. मुळातच शेतकऱ्याला रात्रीची दहा, तर दिवसा आठच तासांची वीज मिळते. मात्र, तीही अखंडित मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले असून, स्थानिक वायरमन, शाखा अधिकारी यांना जाब विचारत आहेत. आधीच कुठल्याही पिकाला भाव नाही. अशात शुक्रवारी (ता. १०) दिवसभर वीजेचा घोटाळा झाल्याने शेतीपंप बंद राहिले. शनिवारी सकाळी नऊ ते पाच वीजपंपाला वीज मिळणे अपेक्षित होते. मात्र, वीज अवघी सव्वातीन ते पाचपर्यंत मिळाली. चौधरवाडी व सोरटेवाडीत फोर्स लोडशेडिंग करण्यात आले.
वास्तविक जेजुरी सबस्टेशनमधून लोणंदला वीज जाते. तिथून सोमेश्वरनगर उपविभाग व शिरवळ उपविभागाला वीजपुरवठा होतो. जेजुरी सबस्टेशनला मागील चार वर्षांपासून नव्या वीजवाहिनीचे काम विविध वादांमुळे रखडले आहे. त्याचा ऐन उन्हाळ्यात फटका बसत आहे. लोकप्रतिनिधींनाची मध्यस्थी गरजेची बनली आहे.


रात्रीची दहा तास वीज मिळत नाही. दिवसा अचानक आमचा चौधरवाडीकडून येणारा फीडर बंद केला जातो. पाणी असून पिके जळताहेत. वीजबिले सक्तीने भरून घेतली जातात. मग किमान आठ तासाची वीजतरी अखंडित द्या.
- संतोष कोंढाळकर, शेतकरी, मगरवाडी

स्थानिक अधिकाऱ्यांना आम्ही काय बोलणार? सरकारची अनास्थाच याला जबाबदार आहे. काल घोटाळ्यामुळे आणि आज फोर्स लोडशेडींगमुळे वीज मिळाली नाही.
- हेमंत गायकवाड, सरपंच, वाघळवाडी

हे फोर्स लोडशेडिंग नाही. जेजुरी लाईनला ओव्हरलोडींग होत आहे. त्यावर लोणंद, भिगवण, यवत, बारामती सबस्टेशन अवलंबून आहेत. लाइनची क्षमता कमी पडत आहे. त्यामुळे ही लाईन ओव्हरलोड होत असून, काही भाग बंद करावा लागत आहे. जेजुरीजवळ ‘महापारेषण’च्या प्रलंबित कामाचा प्रश्न चार वर्षांपासून सुटला नाही. न्यायालयीन बाबी निर्माण झाल्या. वरिष्ठ पातळीपर्यंत तो सोडविण्याचा प्रयत्नही झाला आहे. आठ महिने काही जाणवत नाही, पण चार महिने त्रास होतो.
- गणेश लटपटे, कार्यकारी अभियंता, वीजकंपनी