
वाकी येथे महिला दिनानिमित्त व्याख्यान
सोमेश्वरनगर, ता. १७ : वाकी (ता. बारामती) येथे महिला बचत गटांनी आयोजित केलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमास बावीस गावातील महिलांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात महिलांनी फुगडी, दोरउड्या, बकेटबॉल अशा विविध स्पर्धांचा आनंद घेतला. गप्पागोष्टी, आरोग्यविषयक व्याख्यान, उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान असे उपक्रमही यावेळी पार पडले.
वाकी परिसरात मंजुळा, सत्यम, शिवम, सुंदरम, पंचरत्न, सह्याद्री व सप्तरंग या सात महिला बचत गटांच्या कामाने तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे. समन्वयक बाळासाहेब जगताप यांच्या पुढाकाराने बावीस गावातील महिला, महिला सरपंच उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी सदोबाचीवाडीच्या सरपंच मनिषा होळकर होत्या.
याप्रसंगी पंचायत समितीच्या माजी सदस्या मेनका मगर, रोहिणी जगताप यांच्यासह सुनीता कोंढाळकर, स्नेहा गीते, मंगल खोमणे, गीतांजली जगताप, शीतल मोरे, गीतांजली भापकर, पूनम कारंडे, राजश्री आडके, रेखा बनकर अशा विविध गावच्या सरपंचांनी हजेरी लावली. सर्व महिलांनी फनी गेम्स, गप्पागोष्टी या कार्यक्रमात पद, वय विसरून आनंददायी सहभाग नोंदविला. प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे साडी, इस्त्री व डोसा पॅन भेट दिले. कार्यक्रमात सोमेश्वर कारखान्याच्या इतिहासात पहिल्या उपाध्यक्ष ठरलेल्या प्रणिता खोमणे, राज्यातील पहिल्या महिला एसटीचालक स्वाती इथापे, परिसरातील तंटामुक्त समितीच्या पहिल्या अध्यक्षा माया साळवे यांचा विशेष सत्कार केला. बारामतीच्या नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. तसेच स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. अंजली खाडे यांनी आरोग्यविषय सल्ला दिला. वर्षाराणी जगताप यांनी स्वागत केले. प्राजक्ता यादव यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब जगताप यांनी आभार मानले.
स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्या महिला पुढीलप्रमाणे - बकेट बॉल - अनिता पानसरे, सीमा मदने, शुभांगी जगताप. तळ्यात-मळ्यात - राणी थोपटे, प्रीती चांदगुडे, अश्विनी गाडे. दोरउड्या - शीला गाडेकर, अश्विनी तावरे, उज्वला जगताप. फुगडी जोडी - वनिता निकम व रूपाली निकम.