‘सोमेश्‍वर’कडून १२ लाख टन ऊस गाळप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सोमेश्‍वर’कडून १२ लाख टन ऊस गाळप
‘सोमेश्‍वर’कडून १२ लाख टन ऊस गाळप

‘सोमेश्‍वर’कडून १२ लाख टन ऊस गाळप

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. १९ : येथील सोमेश्वर कारखान्याने रविवारी (ता. १९) बारा लाख टन ऊस गाळपाचा टप्पा ओलांडला. ११.६१ टक्के इतका जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा राखत १४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. हंगाम आता अंतिम टप्प्यावर असून, आता केवळ चाळीस ते पन्नास हजार टन ऊस उरला आहे. याबाबत ‘सर्व उसाचे गाळप केले जाईल’ असे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी आश्वस्त केले आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या हंगामात सुरवातीस मजूर टंचाईचा अडथळा आल्याने आठ हजार टन प्रतिदिन क्षमतेने कारखाना चालत होता. गाळप लांबेल, या काळजीने बराचसा ऊस बाहेरच्या कारखान्यांकडे गाळपासाठी गेला. मात्र, हंगामाच्या मध्यावर नऊ हजार टनांनी जोमात गाळप सुरू झाले. आतापर्यंत १२ लाख ११ हजार टन उसाचे गाळप पूर्ण केले असून, आणखी चाळीस ते पन्नास हजार टन ऊस कार्यक्षेत्रात शिल्लक आहे. त्यामुळे कारखाना मागील पंधरा वर्षात प्रथमच कारखाना मार्चअखेर बंद होणार आहे.
पुरुषोत्तम जगताप व उपाध्यक्षा प्रणिता खोमणे म्हणाल्या, ‘‘सभासद व बिगर सभासद यांचा नोंदलेला सर्व ऊस संपल्यासिवाय कारखाना बंद केला जाणार नाही. कारखान्याने सहवीजनिर्मिती प्रकल्पातून ७ कोटी ९९ लाख युनिट वीजनिर्मिती केली. त्यापैकी ४ कोटी ३१ लाख युनिटची वीज निर्यात केली आहे. डिस्टिलरी प्रकल्पातून ६७ लाख ५३ हजार लिटर अल्कोहोल उत्पादन घेतले असून, त्यासोबत ३२ लाख २० हजार लिटर इथेनॉलची निर्मिती केली आहे.’’

वाढत्या कारखान्यांमुळे मजूर टंचाई नेहमीच जाणवणार असून, त्यासाठीच चालू हंगामात तेरा हार्वेस्टरशी करार केला होता. हार्वेस्टरने १ लाख २३ हजार टन म्हणजे दहा टक्के ऊस तोडला आहे. आगामी हंगामात वीस टक्क्यांपर्यंत जाण्यासाठी हार्वेस्टर खरेदीकरिता सभासदांना बिनव्याजी कर्ज योजना राबविण्याचा विचार करत असल्याचे जगताप यांनी सांगितले.

आगामी हंगामात अनुदान
आगामी हंगामाकरिता उसाचे क्षेत्र वाढावे, यासाठी संचालक मंडळाने मार्चअखेरपर्यंत को ८६०३२, व्हीएसआय ८००५, व्हीएसआय १०००१, फुले २६५ या वाणांच्या रोप पद्धतीच्या लागवडीस परवानगी आहे. तसेच, आगामी हंगामात मार्च, एप्रिलमध्ये तुटणाऱ्या उसाला अनुदान देण्याचा संचालक मंडळाचा विचार आहे. त्यामुळे चालू हंगामात तुटणाऱ्या उसाचा खोडवा राखावा, असे आवाहन पुरुषोत्तम जगताप यांनी केले.