जिल्ह्यातील उसाचा गोडवा घटला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यातील उसाचा गोडवा घटला!
जिल्ह्यातील उसाचा गोडवा घटला!

जिल्ह्यातील उसाचा गोडवा घटला!

sakal_logo
By

संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा

सोमेश्वरनगर, ता. २५ : पुणे जिल्ह्यातील सतरा कारखान्यांनी १२५ लाख ४३ हजार टन उसाचे गाळप केले असून, १२४ लाख ६३ हजार क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. त्यात सोमेश्वर कारखान्याने ११.६३ टक्के साखर उतारा मिळवत सलग सातव्या वर्षी प्रथम स्थान पटकावले आहे. जिल्ह्याचा साखर उतारा मात्र दहा टक्क्यांच्या आतच अडकला असून, मागील हंगामाच्या तुलनेत तो पाऊण टक्क्यांनी घटला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील नऊ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत.

हंगाम महिनाभर आधीच संपणार
जिल्ह्यात मागील वर्षी १५४ लाख टन उसाचे गाळप करत १०.६७ टक्के सरारसरी साखर उतारा राखत १६४ लाख क्विंटल साखरेची निर्मिती झाली होती. हंगाम एप्रिल-मेपर्यंत लांबला होता. चालू हंगामात अकरा सहकारी व सहा खासगी कारखान्यांनी हंगाम घेतला. ऊसटंचाईमुळे हंगाम महिनाभर आधीच बंद होणार आहे. साखर आयुक्तालयाच्या २३ मार्चच्या अहवालानुसार कर्मयोगी (१७ फेब्रुवारी), राजगड (२५ फेब्रुवारी), अनुराज (२७ फेब्रुवारी) हे फेब्रुवारीतच बंद झाले. मार्चमध्ये घोडगंगा (६ मार्च), भीमा-पाटस (१४ मार्च), श्रीनाथ म्हस्कोबा (१५ मार्च), छत्रपती व बारामती अॅग्रो (१८ मार्च) रोजी बंद झाले. सोमेश्वर व माळेगावचा हंगामही मार्चमध्येच संपणार आहे.

‘बारामती ॲग्रो’चे सर्वोच्च गाळप
बारामती अॅग्रोने १६ लाख ४३ हजार टन इतके जिल्ह्यात सर्वोच्च गाळप केले आहे. पाठोपाठ सोमेश्वर व माळेगावने कारखान्यानेही बारा लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तीन वर्षांनंतर सुरू झालेल्या भीमा-पाटसने तीन २ लाख ९४ हजार टनांचे गाळप करत पुनश्च हरिओम केले, मात्र राजगड सर्वच बाबतीत अपयशी ठरला.

सहकारीच सरस
साखर उताऱ्यात सोमेश्वर (११.६३ टक्के) अग्रभागी असून, भीमाशंकर (११.५० टक्के), संत तुकाराम (११.३७ टक्के), व्यंकटेशकृपा (११.०७ टक्के) यांनाच चांगला उतारा मिळाला आहे. इथेनॉलनिर्मितीमुळे काहींचा उतारा घसरला असला, तरीही नीरा भीमा, कर्मयोगी, राजगड यांचा उतारा अत्यंत चिंताजनक आहे. सरसरीमध्ये सहकारी कारखान्यांना १०.२४ टक्के; तर खासगींना अवघा ९.४६ टक्के साखर उतारा मिळाला आहे. परिणामी ‘एफआरपी’त सहकारी सरस ठरणार आहेत.

साखर कारखाना गाळप आढावा
कारखाना एकूण गाळप (टन) साखरनिर्मिती (क्विं.) सरासरी उतारा (टक्के)
बारामती अॅग्रो १६,४३,९०७ १४,४७,२०० ८.८०
सोमेश्वर १२,३५,५६३ १४,३६,७५० ११.६३
माळेगाव १२,३३,२३० १२,८८,१०० १०.४४
दौंड शुगर ९,८७,८५० ९,९७,९४३ १०.१०
भीमाशंकर ९,०८,३१० १०,४४,२०० ११.५०
छत्रपती ८,९५,०६९ ९,४७,८०० १०.५९
विघ्नहर ८,७८,८१० ९,५९,९०० १०.९२
कर्मयोगी ७,१७,९५१ ५,०६,२५० ७.०५
श्रीनाथ म्हस्कोबा ६,३०,८११ ५,४०,७२५ ८.५७
व्यंकटेशकृपा ६,२७,८४० ६,९५,१०० ११.०७
पराग अॅग्रो ६,२६,००० ५,६०,२२५ ८.९५
नीरा भीमा ५,६४,६८२ २,९४,३५० ६.९८
संत तुकाराम ४,८१,७१५ ५,४७,८०० ११.३७
घोडगंगा ४,३८,३३४ ४,५०,१०० १०.२७
अनुराज ३,२५,७३१ ३,३८,१५० १०.३८

भीमा पाटस २,९४,७५५ २,६९,२२५ ९.१३
राजगड ५२,५५१ ३९,२५० ७.४७