ऊस बेणे उत्पादनात पाच पटीने वाढ

ऊस बेणे उत्पादनात पाच पटीने वाढ

सोमेश्वरनगर, ता. २६ ः पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर यांच्या नेतृत्वाखाली ऊस बेणे उत्पादनात तब्बल पाच पटीने वाढ केली आहे. यामुळे नव्वद कारखान्यांसह राज्यातील व राज्याबाहेरील हजारो शेतकऱ्यांना सर्वोत्कृष्ट दर्जाचे बेणे मिळू शकले. या उपलब्धीमुळे दरवर्षी ४२ लाख रुपयांचा महसूल मिळत होता. तो चालू लागवड हंगामात तब्बल दोन कोटींवर जाऊन पोचला आहे. पडीक क्षेत्र वहिवाटीखाली आणल्याने हा चमत्कार घडू शकला.
नीरानजीक पाडेगाव (ता. खंडाळा) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे ऊस संशोधन केंद्र नव्वद वर्षांपासून कार्यरत आहे. त्याला केंद्र शासनाकडून अनुदान मिळणे बंद झाल्याने फार्म चालविणे अशक्यप्राय बनले होते. कर्मचारी व संशोधकांच्या निम्म्यापेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. जुलै २०१८ मध्ये डॉ. भरत रासकर यांची ऊस विशेषज्ञ म्हणून नियुक्ती झाली. कमी मनुष्यबळाचा सुयोग्य वापर करत आणि संशोधकांना पाठबळ देत त्यांनी बदल घडवून आणले. आधी फार्मवरील तण व वेलींनी वेढलेली ऊसशेती तणमुक्त केली.
एकूण ३२५ एकरांपैकी ७५ एकरांवर वेड्या बाभळी वाढल्या होत्या. त्या खर्च न करता निघाल्या. डॉ. रासकर यांनी आदिवासी कुटुंबांना बाभळी काढून कोळसा बनविण्याची मुभा दिली. त्याबदल्यात त्यांनी रान मोकळे करून मशागत करून दिली. दरवर्षी २५ एकरापर्यंतचे बेणेप्लॉट शेतकऱ्यांसाठी असायचे. टप्प्याटप्याने त्यात वाढ केली. चालू लागवड हंगामात तर ६२. ५ एकर बेणे शेतकऱ्यांना पुरविले. नव्वद कारखान्यांना प्रत्येकी वीस मोळ्या बेणे प्लॉट तयार करण्यासाठी दिले. तर शेतकऱ्यांना प्रत्येकी एक ते तीन मोळ्या देण्यात आल्या. राज्यासह मध्यप्रदेश, गुजराथ, कर्नाटकमध्येही बेणे पोचले. यातून मागील वर्षी सव्वा कोटी तर यावर्षी दोन कोटींच्या रिसिट फाटल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले.
ऊस उत्पादक डॉ. कुलदीप काकडे म्हणाले, ‘‘डॉ. रासकर यांच्या व्यवस्थापनामुळे आम्हाला दर्जेदार बियाणे मिळत आहे. शिवाय व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन मिळत आहे.’’

राज्यभरातून शेतकऱ्यांचा बेण्यासाठी प्रचंड ओघ वाढला आहे. एका शेतकऱ्यास दहाच ऊस दिले. त्यांनी स्वतःच्या शेतात प्लॉट करण्यासाठी प्रबोधन केले. दहा उसाच्या दोनशे डोळ्यांपासून एक हजार ऊस तयार करायला लावले. एक हजार उसाचे वीस हजार डोळे काढून दोन एकर लागवड होऊ शकली. दरवर्षी दोन डोळ्यांची एक कोटी टिपरी पुरविली. त्यातून चार हजार एकर लागवड शेतकऱ्यांनी केली. त्यातून सुमारे तीन लाख एकर क्षेत्रावर दर्जेदार बेण्याची लागवड झाली. आता हे बेणे राज्यभर पोचेल. बेणे बदलाने उत्पादनात पंधरा टक्के वाढ होते.
-डॉ. भरत रासकर, ऊस विशेषज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com