नीरा बाजार समितीच्या सभापतीची उत्सुकता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नीरा बाजार समितीच्या सभापतीची उत्सुकता
नीरा बाजार समितीच्या सभापतीची उत्सुकता

नीरा बाजार समितीच्या सभापतीची उत्सुकता

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. १६ : नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतिपदाची निवड २२ मे रोजी (सोमवारी) होणार आहे. महाविकास आघाडीची निर्विवाद सत्ता प्रस्थापित झाली असून, पहिले सभापतिपद काँग्रेसला मिळणार की राष्ट्रवादी कॉंग्रेसला, याकडे पुरंदर व बारामती तालुक्याचे लक्ष लागले आहे. इच्छुकांनीही आपापल्या पद्धतीने पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
नीरा बाजार समितीत राष्ट्रवादी, काँग्रेस व ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीने सर्व अठरा जागांवर निर्विवाद विजय मिळविला. समितीत पुरंदरची शंभर; तर बारामतीची ३२ गावे जोडली आहेत. राष्ट्रवादीचे पुरंदरमधून पाच व बारामतीतून पाच, असे दहा; तर काँग्रेसचे पुरंदरमधून आठ संचालक आहेत. मावळते अध्यक्ष मुरलीधर ठोंबरे हे राष्ट्रवादीचे बारामती तालुक्यातील उमेदवार होते. त्यामुळे यावेळी सभापतिपदी पहिल्यांदा पुरंदरमधील संचालकाची वर्णी लागेल, अशी शक्यता आहे. मागील काळात सुरवातीला काँग्रेसला आणि त्यानंतर राष्ट्रवादीला संधी मिळाली होती. यावेळीही दोन्ही पक्ष वर्षांचे वाटप करून घेतील. त्यादृष्टीने पुरंदरची दोन्ही पक्षांची नेतेमंडळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना नुकतीच भेटली आहेत. मात्र, अद्यापही पहिले सभापतिपद काँग्रेसला की राष्ट्रवादीला, ही बाब अजून गुलदस्तात आहे.
दरम्यान, २२ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजता सहायक निबंधक श्रीकांत श्रीखंडे यांच्या अध्यक्षतेखाली सासवड येथील बाजार समितीच्या कार्यालयात सभापती व उपसभापतिपदाची निवडप्रक्रिया पार पडणार आहे. सभापतिपदासाठी दोन्ही पक्षातून संदीप फडतरे, अशोक निगडे, देविदास कामठे, वामन कामठे, शरद जगताप, बाळासाहेब जगदाळे, ही नावे आघाडीवर आहेत. उपसभापतिपदासाठी शरयू वाबळे, मनीषा नाझीरकर, शाहजान शेख या तीन महिला किंवा गणेश होले, भाऊसाहेब गुलदगड, महादेव टिळेकर, अशा अन्य प्रवर्गातील संचालक असू शकतो.

‘अजित पवार यांना सर्वाधिकार’
याबाबत राष्ट्रवादीचे पुरंदर तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे म्हणाले, ‘‘अजून कुठलाही अंतिम निर्णय नाही. परंतु, महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही अजितदादा पवार यांना सर्वाधिकार दिले आहेत. काँग्रेसचे पुरंदर तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण म्हणाले, ‘‘आम्ही नुकतीच अजितदादांशी भेट घेतलेली आहे. अजितदादांना सर्वाधिकार आहेत. आमदार संजय जगताप त्यांच्याशी बोलतील आणि निर्णय होईल. एका पक्षाला सभापतिपद, तर दुसऱ्याला उपसभापतिपद मिळेल.’’