
दुधाचे दर घसरल्याने उत्पादक धास्तावले
सोमेश्वरनगर, ता. १८ : राज्यसरकारचे दूध धंद्याकडे दुर्लक्ष आणि दूधधंदा बड्या प्रकल्पांच्या नियंत्रणाखाली गेल्याने विलक्षण चढउतार येत आहेत. दुधाला चांगले दर मिळू लागल्याने लाखो रुपये खर्चून गोठे उभारले होते. परंतु दुधाचे दर ३७ ते ३८ रुपये लिटरहून ३४ ते ३५ रुपये लिटरवर घसरले आहेत. यामुळे दूध उत्पादक धास्तावले आहेत.
कोरोना व लंपीच्या वादळात दूध उत्पादकाचे कंबरडे मोडले होते. मात्र, मागील काही महिन्यात प्रतिलिटर ३७ ते ३८ रुपये दर मिळाल्याने तो सावरला. अगदी पंजाब, हरियाना, बेंगलोर येथे जाऊन सव्वा ते दीड लाखाच्या गाई खरेदी करून गोठे वाढविले होते. मात्र, एप्रिलमध्ये केंद्रसरकारने गरज पडल्यास दुग्धजन्य पदार्थ आयात केले जातील, असे सांगितले आणि अस्थिरता आली. आता जागतिक बाजारात दर पडलेल्या पदार्थांची आयात झाली तर धंदा कोलमडेल अशी भीती स्थानिक प्रकल्पांना आहे. महाराष्ट्राचा दूध व्यवसाय तर निवडक प्रकल्पांच्या हाती गेला असून त्यांनी दूधखरेदी दरात घट करायला सुरवात केली आहे. पुणे जिल्ह्यात अडीच तीन रुपये तर नजीकच्या नगर, सोलापूर या जिल्ह्यात घट चार रूपये प्रतिलिटरवर गेली आहे. मोजक्या व्यावसायिकांनी अमूलच्या स्पर्धेसाठी कसरत करत ३६ रुपयांवर दर दाबून ठेवले आहेत. सरकारकडून हस्तक्षेप न झाल्यास दर आणखी घसरण्याची शक्यता आहे.
पशुखाद्य १६०० रुपये झाले आहे. चारा व औषधं महागली आहेत. दर अधिक घटले तर उत्पादकांचा संयम टिकणार नाही. त्यामुळे ३७ रुपये प्रतिलिटर एफआरपी मिळावी.
-विजय मेमाणे, दूध उत्पादक (ता. पुरंदर)
पशुखाद्यासह सगळेच दर वाढल्याने शेतकऱ्याला दरात घट परवडणारी नाही. गोवा, कर्नाटक, गुजरातमध्ये सरकार अनुदान व अन्य रूपाने शेतकऱ्यांना मदत करते. तसे निर्णय घ्यावे लागतील. छोटे डेअरीवाले जास्त अडचणीत येणार आहेत.
- संग्राम सोरटे, अध्यक्ष, नवनाथ दूधसंस्था
दूध उत्पादन वाढल्याने प्रकल्प दूध घेईनात. पावडरचे दर कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे सध्या सुमारे साडेचौतीस रुपये दर शेतकऱ्यांना मिळत आहे. शेतकरी व संकलकांनी चांगल्या प्रतिचे दूध घालावे.
- संदीप जगताप, अध्यक्ष, बारामती सहकारी दूधसंघ
दुग्धजन्य पदार्थांचा खप घटला
दूध दर वाढीबाबत प्रकाश कुतवळ म्हणाले, की आयातीचे वातावरण तयार करायला नको होते. या भीतीनेच पावडर व बटरच्या किमती उतरल्या. तसेच उन्हाळाही म्हणावा असा सलग झाला नाही. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांचा खपही घटला. तसेच पिशवीबंद दूध व्यवसायात बाहेरच्या राज्यांतील दुधाचा प्रचंड शिरकाव झाला आहे. अशा कारणांनी दरावर परिणाम झाला आहे.