
जगताप यांना आदर्श तलाठी पुरस्कार
सोमेश्वरनगर, ता. २० : महसूल विभागातील उत्कृष्ट कामाबद्दल तलाठी सुरेश भगवान जगताप यांना नुकताच पुणे विभागाचा ''आदर्श तलाठी'' पुरस्कार प्रदान करण्यात आला. बारामती तालुक्यास बारा वर्षानंतर हा मान मिळाला आहे. सेनादलात असताना कारगिल पदक प्राप्त केलेल्या जगताप यांनी तलाठी म्हणूनही पदक प्राप्त केल्याने अधिक कौतुक होत आहे.
जगताप हे सध्या बाबुर्डी (ता. बारामती) येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी बारामतीतच करंजे, होळ, काटेवाडी, मुढाळे, नारोळी या गावांमध्ये शेतकरीभिमुख कामाचा ठसा उमटवला आहे. शेतकऱ्यांची अडवणूक न करता उलट कार्यालयात अधिकाधिक वेळ देणारे म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वप्रथम शंभर टक्के सातबारा संगणकीकरण करण्याची कामगिरी त्यांनी केली होती. याशिवाय मागील सलग दोन वर्ष कऱ्हेला महापूर आले. या काळात पुरात अडकलेल्यांची सुटका, शेती व घरांचे पंचनामे, कोविडकाळातील कामगिरी याबाबतीत उत्कृष्ट काम केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील दीड हजार तलाठ्यांमधून एकमेव पवार यांची पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आदर्श तलाठी पुरस्कारासाठी निवड झाली.
विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनीही तिथे पवार यांचे कौतुक केले. बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
02605