सुवर्णा निंबाळकर बनली राजपत्रित अधिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुवर्णा निंबाळकर बनली राजपत्रित अधिकारी
सुवर्णा निंबाळकर बनली राजपत्रित अधिकारी

सुवर्णा निंबाळकर बनली राजपत्रित अधिकारी

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. ४ ः येथील सुवर्णा राजेंद्र निंबाळकर या युवतीने मागील सात महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सलग तीन परीक्षांमध्ये यश मिळविले आहे. सध्या तिने ‘सरकारी कामगार अधिकारी’ हे राजपत्रित अधिकारीपद पटकावले आहे. गेली पाच वर्ष पुणे विद्यापीठात राहून सोशल मिडियात न अडकता आणि कुठलेही क्लासेस न लावता यशाला गवसणी घातली आहे.

येथील सोमेश्वर कारखान्याच्या चाळीमध्ये राहणाऱ्या राजेंद्र निंबाळकर या मेडिकल चालकाच्या तीनही मुलांची परिसरामध्ये कौतुकाचा विषय आहे. थोरल्या सुवर्णाने शालेय वयापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आणि एमएस्सी झाल्यावर नोकरीच्या मागे न लागता स्वप्न साकार केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कंबाईन्ड परीक्षेच्या नोव्हेंबर २०२२ मध्ये लागलेल्या निकालात सुवर्णाने ‘राज्य कर निरीक्षक’ पद प्राप्त केले. सध्या या पदावर ती कार्यरतही आहे. डिसेंबर २०२२ मध्ये एमपीएससीच्याच इंडस्ट्रिअल इन्स्पेक्टर पदाच्या परीक्षेतही यश मिळविले. आता नुकताच राज्यसेवा परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये ९०० पैकी ५१५ गुण प्राप्त करत ‘सरकारी कामगार अधिकारी’ गट ‘ब’ या राजपत्रित अधिकारी पदावर आपले नाव कोरले आहे. पुढे राज्यसेवेतूनच उपजिल्हाधिकारी पद प्राप्त करण्याचा निर्धार तिने केला आहे.
सुवर्णाने सोमेश्वर विद्यालयात दहावीपर्यंत तर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेतले. सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात बीएस्सी मॅथ्स केले, आणि ९४ टक्के गुण मिळवून विद्यापीठात सातवे स्थान पटकावले. पुणे विद्यापीठात एमएस्सी केल्यानंतर तिथेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला होता.

अभ्यासात सातत्य ठेवले. पंधरा दिवसांतून एक ब्रेक घ्यायचे. रोज आठ ते नऊ तास अभ्यास पुरेसा ठरला. विद्यापीठातील वातावरणाचा उपयोग झाला. कोरोनाकाळात मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा घरी अभ्यासासाठी उपयोग करून घेतला. कौटुंबिक आणि आर्थिक अडचणी या जवळपास सगळ्यांनाच असतात, त्याचा ताण घेतला नाही. आई-वडिलांच्या पाठिंब्यावर यश मिळाले.
- सुवर्णा निंबाळकर

सोशल मिडियापासून दूर
सोशल मिडिया या सगळ्यांपासून मी दूर होते. फक्त कॉलपुरता मोबाईल वापरला. याशिवाय ग्रामीण भागात वाढल्यामुळे चौफेर विचार करण्याची सवय झाली. ताण सहन करण्याची, समज वाढण्याची प्रक्रिया ग्रामीण जीवनात होते. अवांतर पुस्तक वाचन व वृत्तपत्र वाचनाचा उपयोग यशासाठी झाला, असे यशाचे गुपित सुवर्णा निंबाळकर हिने सांगितले.

सोमेश्वरनगर (ता. बारामती) : सुवर्णाचे निंबाळकर हिचे कौतुक करताना आई-वडील