साखर कारखान्यांकडून जय्यत पूर्ण
सोमेश्वरनगर, ता. २८ : राज्य सरकारच्या परवानगीनुसार साखर हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांनी जय्यत जिल्ह्यातील कारखान्यांनी जय्यत तयारी पूर्ण केली आहे. ऊसतोड मजूरही मोठ्या संख्येने दाखल होऊ लागले आहेत. मात्र, प्रारंभाच्या या प्रयत्नांवर पावसाचे पाणी पडत आहे. आता निवडक ऊसतोडी देऊन रडतखडत कारखाने सुरू करावे लागणार आहेत. ऊसतोड मजुरांचेही आल्या आल्या हाल होऊ लागले आहेत.
परतीच्या पावसाचा अंदाज असल्याने सरकारने एक नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांना गाळप सुरू करण्यास परवानगी दिली. दिवाळी उरकून ऊसतोड मजूर कारखान्याकडे येऊ लागले आहेत. जिथून निघणार आहेत त्या बीड, जालना, जळगाव जिल्ह्यांमध्येही पाऊस आहे आणि जिथे पोहोचायचे आहे त्या कारखान्यांवरही पाऊस आहे. त्यामुळे घरून निघाल्यापासून कारखान्यावर जाऊन कोप उभारेपर्यंत पावसाचा त्रास मजुरांना होत आहे. कारखान्यांवर जाऊन चांगली जागा शोधून कोपी उभारण्याची धामधूम सुरू आहे. शिवाय जनावरांना चारा शोधतानाही त्यांची धावपळ होत आहे. तर काही मजूर निघण्यासाठी पाऊस थांबायची वाट पाहत आहेत.
साखर कारखान्यांनीही मजूर, वाहने, अंतर्गत यंत्रणा सुसज्ज केली आहे. धुराडे पेटवून गव्हाणीत मोळीच टाकायची बाकी असताना गेले चार दिवस पुणे जिल्ह्यात अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे बहुतांश शेतजमीनींमध्ये पाणी साचले आहे. चांगल्या मातीच्या जमीनींचा ओलावा दूर व्हायला पंधरा दिवस जाणार आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना निचऱ्याच्या, डोंगरउतारावरच्या किंवा रस्त्याकडेच्या शेतातील ऊस तोडून आणून कारखाने कसेबसे सुरू करावे लागणार आहेत. दोन-तीन दिवसात गाळप सुरळीत होत असते. परंतु यावेळी रडतखडत गाळप सुरू होईल पण ते सुरळीत व्हायला पुन्हा १५ नोव्हेंबर उजाडेल अशीच सध्या चिन्हे आहेत. ज्या कारखान्यांकडे दोन मिल आहेत त्यांना एका मिलवर कारखाना चालवावा लागणार आहे तर एक मिल असणाऱ्या कारखान्यांना ‘नोकेन’ उसावर (अपुऱ्या उसावर) कारखाना चालवावा लागणार आहे.
मजूर कारखान्यांकडे रवाना झाले आहेत. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने आणि शेतात पीक नसल्याने मजूर मोठ्या संख्येने कारखान्यांकडे जातील. काही मजूर निघण्यासाठी पाऊस थांबायची वाट पाहत आहेत.
- गहिनीनाथ थोरे पाटील, अध्यक्ष, मुकादम संघटना, बीड
पाऊस असला तरीही एक नोव्हेंबरला कारखाना निश्चित सुरू होणार. त्यासाठी पुरेशी तोडणी यंत्रणा जुळलेली आहे. तोडणी कार्यक्रमही आखला आहे. आता सर्वच कारखान्यांना सुरुवातीला निवडक फड तोडून आणून कारखाना सुरू करावा लागणार आहे.
- बापूराव गायकवाड, सोमेश्वर कारखान्याचे शेती अधिकारी
05026
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

