
काऱ्हाटीत लोणकर विरुद्ध लोणकर
सुपे, ता. १२ : काऱ्हाटी (ता. बारामती) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदासाठी लोणकर विरुद्ध लोणकर, अशी चुरस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात ही लढत आहे.
यशवंत जानाई पॅनेल व यशवंत परिवर्तन पॅनेलमध्ये ही निवडणूक होत आहे. १ हजार ५४३ पुरुष व १ हजार ४५६ स्त्रिया मिळून एकूण २ हजार ९९९ मतदार संख्या आहे. सरपंचांसह एकूण १२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. प्रभाग चारमध्ये एक अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत असून, बाकी जागांवर एकासएक उमेदवार असल्याने निवडणुकीची चुरस वाढली आहे. मात्र, खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक लढवली जाणार असल्याची माहिती दोन्ही पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी दिली.
यशवंत जानाई पॅनेलच्या सरपंच दाच्या उमेदवार दीपाली लोणकर यांनी याआधी उपसरपंच म्हणून काम केले आहे. तर, त्यांच्या पॅनेलमधील सुरेखा खंडाळे यांनी सरपंच म्हणून सुमारे पाच वर्षांपूर्वी काम केले आहे. अन्य नवीन उमेदवारांना संधी दिली आहे.
यशवंत परिवर्तन पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवार रेखा लोणकर या पदवीधर आहेत. या पॅनेलमधून अशोक लोणकर यांनी उपसरपंच म्हणून काम केलेले आहे. या पॅनेलनेही अन्य नवीन उमेदवारांना संधी दिली आहे.