दुष्काळी गावांना पाणी मिळावे

दुष्काळी गावांना पाणी मिळावे

सुपे, ता. २५ : बारामती तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतीसाठी जनाई-शिरसाई उपसा जल सिंचन योजनेचे सुमारे साडेतीन टीएमसी पाणी प्राधान्याने मिळाले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्याकडे पत्राद्वारे मागणी करत आहे. हा प्रश्न सुटला नाही, तर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती माजी मंत्री विजय शिवतारे यांनी दिली.

बारामती तालुक्यातील सुपे परगण्यातील दुष्काळी गावांचा गावभेट दौऱ्यानिमित्त चांदगुडेवाडी (ता. बारामती) येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे, जिल्हा महिला समन्वयक डॉ. ममता लांडे-शिवतारे, सीमा कल्याणपूरकर, अॅड. गितांजली ढोणे, तालुका प्रमुख स्वप्नील जगताप, पोपटराव खैरे, अमोल देवकाते, सिद्धेश्वर शेळके, महादेव भोंडवे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवतारे म्हणाले, ‘‘बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांचे वाळवंट झाले आहे. जनाई-शिरसाई योजनेद्वारे बारामती, दौंड व पुरंदर तालुक्यांच्या दुष्काळी भागातील गावांना सुमारे साडेतीन टीएमसी पाण्याचे नियोजन करून वर्षभर टप्प्याटप्प्याने दिले पाहिजे. असे असताना २० टक्केसुद्धा पाणी दिले गेले नाही. गेल्या पाच वर्षात या दुष्काळी गावांना ६०० एमसीएफटी सुद्धा पाणी मिळाले नाही.’’
‘‘डीपीआरप्रमाणे क्षेत्र आणि गावांना कायद्यात बदल करून दुष्काळी भागाला पाणी दिले पाहिजे, यासाठी पाठपुरावा करणार आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना आवाहन आहे की, पाच वर्षात योजनेचे किती पाणी शेतीसाठी मिळाले, त्याचा आढावा घ्या. तुमचे तुम्हाला वाईट वाटेल, सिंचन योजनेचे पाणी मिळण्यासाठी पाणीपट्टीचे पैसे भरायला दौंड तालुक्यातील पाटसला जावे लागते. किमान पैसे भरून घेण्याची व्यवस्था सुपे येथे झाली, तर शेतकऱ्यांचे हेलपाटे वाचतील,’’ असे मत शिवतारे यांनी व्यक्त केले.

प्रस्थापितांना आवाहन आहे. या भागाचा दौरा करा. या भागाला कोणी वाली नाही. गेल्या ५० वर्षापासून येथील साधे प्रश्न सुटलेले नाहीत. बारामतीच्या पश्चिम दुष्काळी ६७ गावांचा बेगडी विकासाचा पंचनामा करणार आहे.
- विजय शिवतारे, माजी मंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com