
शिरूर बसस्थानकाची अवस्था केविलवाणी
शिरूर, ता. ३० : शिरूर बसस्थानकाचे दोन वर्षांपासून खासगीकरणातून विकासाचे (बीओटी) काम सुरू आहे. बीओटीच्या कामामुळे, कोरोनाच्या कहरामुळे आणि कामगारांच्या संपामुळे मूळातच घरघर लागलेल्या शिरूर बसस्थानकाचे चित्र सध्यातरी केविलवाणे आहे. ''प्रवाशांच्या सेवेसाठी'' असे ब्रीदवाक्य दिमाखात मिरवणाऱ्या एसटीच्या शिरूर स्थानकावर मात्र सर्वच मूलभूत सुविधा कोलमडून पडल्याचे चित्र आहे.
मुख्य इमारतीचा काही भाग वगळता कॅंटीनसह इतर वास्तू पाडल्याने प्रवाशांना बसण्यास जागा नाही. पाण्याची टाकी आहे पण तीत पाणीच नसल्याने पाण्याच्या बाटल्या विक्रेत्यांची चंगळ झाली आहे. स्वच्छतेचा कुठलाही मागमूस उरला नसून, प्रवाशांच्या निवाऱ्यासाठी तात्पुरते पत्राशेड उभारले आहे.
शिरूर आगारातील नव्वद टक्के कामगार प्रवासी सेवेत रुजू झाल्याने येथील ४६ पैकी एखाद - दुसरा अपवाद वगळता लालपरीची चाके गतिमान झाली आहेत. लोकलबरोबरच लांब पल्ल्यांच्या बसेसही सुरळीतपणे मार्गस्थ झाल्याने दुरावलेला प्रवासी अल्पावधीतच एसटीकडे परतू लागल्याचे चित्र आहे, असे असले तरी जुळलेला हा प्रवासी टिकवून ठेवण्यासाठीचे नियोजन व त्याच्या सुविधांबाबत शिरूर बसस्थानकावर उदासिनताच जाणवते.
यामुळे होतेय प्रवाशांच्या हालाची परिसीमा
१. दर्शनी बाजूला दाटीवाटीने उभे असलेले फळविक्रेते,
२. डाव्या बाजूला रिक्षांची रांग; तर उजव्या बाजूला खासगी वाहनांची भाऊगर्दी
३. ''बीओटी'' च्या धीम्या गतीने चालू असलेल्या कामांमुळे आणखीनच दुर्दशा
४. बांधकामांचा राडारोडा, त्यामुळे पसरणारी धूळ,
५. कट झालेले पाण्याचे कनेक्शन आणि पत्र्यांनी बंदीस्त केलेले सुलभ शौचालय
-------------------------------------------
नवीन बसस्थानकाच्या कामामुळे प्रवाशांना मूलभूत सुविधा देण्यावर मर्यादा येत असल्या तरी भविष्यात सुसज्ज बसस्थानक व त्याजोडीने अद्ययावत सुविधा उभ्या राहणार असल्याने चांगल्या सोयीसुविधा मिळतील. जलद प्रवासी सेवा देताना सुखद मूलभूत सुविधांचाही नवीन कामे करताना प्राधान्याने विचार केला आहे.
- महेंद्र माघाडे, आगार व्यवस्थापक, शिरूर
शिरूर बसस्थानकात प्रवाशांसाठी कुठल्याही मूलभूत सुविधा नाहीत. कॅटीनमधून रास्त दरात खाद्यपदार्थ मिळत होते, ते पाडले. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. अनेक बसेस गावाबाहेरून जातात. वेळ वाचविण्याचे कारण त्यासाठी दिले जाते. मात्र, पुढे या सर्व बसेस ढाब्यांवर थांबतात. हे बेकायदा थांबे कुणाच्या आशीर्वादाने चालतात, याची चौकशी व्हावी. एसटी महामंडळाचे प्रवाशांसाठी कुठलेच ठोस धोरण नाही.
अनिल बांडे, अध्यक्ष, शिरूर प्रवासी संघ
00519
Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00317 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..