
इनामगावात मजूर महिलेवर बलात्कार
शिरूर, ता. ६ ः डोक्याला पिस्तूल लावून पतीसह खलास करण्याची धमकी देऊन मजूर महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी श्रीनिवास
बाबूराव घाटगे (रा. इनामगाव, ता. शिरूर) याच्यावर गुन्हा दाखल केला. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा
संचालक असलेला घाडगे हा शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बडा पदाधिकारी आहे.
बलात्कार झालेल्या मजूर महिलेने या अत्याचाराविरुद्ध जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे धाव घेतली होती. त्यांच्या आदेशावरून शिरूर पोलिसांनी घाटगे याच्याविरूद्ध
गुन्हा दाखल केला असून, गुन्हा दाखल होताच तो फरार झाला. १३ मार्च रोजी इनामगाव (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेनजीकच्या एका बांधकामावर हा प्रकार घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला, जिल्हा परिषद शाळेजवळील एका पडक्या खोलीत वीटा उचलत असताना घाटगे तेथे आला. तेथे त्याने पिस्तूलचा धाक दाखवून अत्याचार केला. मदतीसाठी आरडाओरडा करू पाहणाऱ्या महिलेच्या डोक्याला पुन्हा पिस्तूल लावली. थोड्या वेळाने संबंधित महिलेची जाऊ तेथे आली असता घाटगे याने तिलाही पिस्तुलाचा धाक दाखवला. याबाबत वाच्यता केल्यास तुम्हाला गावातून हाकलून देईन, दोघींना तुमच्या नवऱ्यांसह मारून टाकीन, अशी धमकी दिली.
दरम्यान, या गंभीर घटनेची दखल घेत जिल्हा पोलिस अधिक्षकांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांनी पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्यासह घटनास्थळी भेट दिली. गुन्हा दाखल होताच घाटगे फरार झाला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चरापले करीत आहेत.
Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00328 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..