
शिरूरमध्ये नगर रस्ता रोखला
शिरूर, ता. ९ : औरंगाबाद येथे मातंग समाजातील तरुणाची बेदम मारहाण करून हत्या होऊनही तपासकामात व आरोपींना शिक्षा देण्यात शासन स्तरावर दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ लहूजी शक्ती सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. ९) भर उन्हात सतरा कमानी पुलाजवळ पुणे-नगर रस्ता रोखून धरला. सुमारे अर्धा तास झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली.
औरंगाबाद येथे वीस एप्रिल रोजी मनोज शेषराव आव्हाड या तरुणाची बेदम मारहाण करून हत्या होऊनही शासनाने दखल घेतली नसल्याचा व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात चालढकल केली जात असल्याचा आरोप करीत समाजबांधवांनी सोमवारी भर उन्हात महामार्गावर ठिय्या दिला. लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे, प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे, लहुजी शक्ती सेनेच्या विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हेमंत खंदारे, पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय खंदारे, शिरूर शहराध्यक्ष विशाल (बंटी) जोगदंड, उपाध्यक्ष सचिन काळोखे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मोनिका जाधव, शहर अध्यक्षा संध्या जाधव, नानू भवाळ, बबईताई नाडे, दादाभाऊ लोखंडे, मयूर भोसले, पप्पू शेंडगे, आकाश पवार, आदिक ओव्हाळ, संदीप नेटके, नागेश शेलार, नागेश साळवे, दत्ता साळवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तरुणांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
तरुण आक्रमक
भर उन्हात काही तरूणांनी शर्ट काढून तापलेल्या सडकेवर लोळण घेतली. आपल्या मृत भावाला न्याय मिळावा म्हणून आक्रोश केला. शासनाच्या उदासीन भूमिकेचा बोंब मारीत निषेध केला. सुमारे अर्धा तास चाललेल्या या ‘जनआक्रोश रास्ता रोको’मुळे पुणे-नगर रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पोलिसांची त्रेधातिरपीट
पुणे-नगर रस्त्यावर अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची धावपळ उडाली. याच रस्त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे जाणार असल्याने पोलिसांनी सकाळपासूनच बंदोबस्त ठेवला होता. मंत्र्याचा ताफा पुढे गेल्यानंतर पोलिस निघून जात असतानाच चारशे ते पाचशे आंदोलक दोन्ही बाजूंनी अचानक रस्त्यावर आले. त्यामुळे पोलिसांची पुरती त्रेधातिरपीट उडाली. शिरूर व रांजणगाव
एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बंदोबस्त ठेवला. पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.
PNE22S63112
Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00332 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..