ऐंशी जणांना बोगस नियुक्तीपत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐंशी जणांना बोगस नियुक्तीपत्र
ऐंशी जणांना बोगस नियुक्तीपत्र

ऐंशी जणांना बोगस नियुक्तीपत्र

sakal_logo
By

शिरूर, ता. १५ : रांजणगाव (ता. शिरूर) एमआयडीसीतील एका प्रतिथयश कंपनीच्या नावाने बनावट सही, शिक्के तयार करून त्याआधारे बिहारमधील अनेक तरुणांना कंपनीतील कामाचे नियुक्तीपत्र देणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले. या दोघांनी प्रत्येकी पाच हजार रुपयाप्रमाणे सुमारे चार लाख रुपये गोळा करून तब्बल ऐंशी जणांना बोगस नियुक्तीपत्र दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत ‘हायर अप्लायन्सेस इं प्रा. लि.’ या कंपनीचे एचआर प्रणय सूर्यकांत धुमाळ (रा. मोशी) यांनी फिर्याद दिली असून, रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी राहुल गौतम गरामी व सुमन तितास मंडल (दोघे रा. जमालपूर, पश्चिम बंगाल) यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, यासीन मोहम्मद जमशेद, मोहम्मद आर्यन चुन्ना व मोहम्मद फुरकान बद्रुजसमा (तिघे रा. बरहपुरा, जगदीशपूर, ता. इसाकचक, जि. भागलपूर, बिहार) हे तीन तरूण बुधवारी (ता. १५) सकाळी ११ च्या सुमारास रांजणगाव ‘एमआयडीसी’तील हायर कंपनीच्या गेटवर आले व आम्हाला कंपनीचे नियुक्तीपत्र मिळाल्याने कंपनीत जॉईन व्हायला आलो असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर आमचे आणखी ७७ सहकारी रांजणगाव गणपतीमधील भांबर्डे रोडवर थांबले असून, त्यांनादेखील नियुक्ती पत्र मिळाल्याचे सांगितल्याने व कंपनीत प्रवेश करू लागले. त्यामुळे सुरक्षा रक्षकाने नियुक्तीपत्राची खात्री करण्यासाठी ते धुमाळ व अंकलेश महाले या ‘एचआर’ना दाखविले. तेव्हा त्यांनी ते पत्र आपल्या कंपनीचे नसल्याचे सांगितले व पत्रासह थेट एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेतली. आमच्या कंपनीच्या नावाने बनावट शिक्के वापरून, बोगस सह्या करून बनावट नियुक्ती पत्र दिल्याची तक्रार दिली.
एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेत विलास आंबेकर, ब्रह्मानंद पोवार, रघुनाथ हाळनोर या पथकासह फसवणूक झालेल्या तिघा तरुणांना सोबत घेऊन तातडीने तपासाची चक्रे फिरवली. भांबर्डे रस्त्यावरील एका खोलीजवळ पथक पोचले, तेव्हा गरामी व मंडल हे कामगारांकडून नियुक्तीपत्राच्या बदल्यात प्रत्येकी पाच हजार रुपये घेत असल्याचे दिसून आले. तेव्हा पोलिसांनी दोघांनाही पकडले.

असे अडकले जाळ्यात
अटक केलेले राहुल गरामी व सुमन मंडल हे दोघे गेल्या गेल्या रविवारी (ता. ५) बिहारमधील भागलपूर येथील आयटीआय कॉलेजमध्ये गेले. तेथील प्राचार्य व शिक्षकांना, ‘आम्ही पुण्याच्या हायर कंपनीतून आलो असून, कंपनीत कामगारांची भरती चालू असल्याने तुमच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी मुलाखती घेऊ इच्छितो,’ असे सांगितले. मुलाखतीनंतर ऐेंशी विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे सांगत त्यांना नियुक्तिपत्रही लगेच दिली. त्यानंतर तरुणांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये गोळा करण्यास सुरवात केली. काही तरूणांनी पैसे न दिल्याने त्यांच्याकडून पैसे घेण्यासाठी ते रांजणगाव येथे आले आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडले.

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00386 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top