
लाचखोर पोलिसावर रांजणगावात कारवाई
शिरूर, ता. १८ : रांजणगाव (ता. शिरूर) ‘एमआयडीसी’तील एका कंपनीकडे ठेकेदाराची येणे असलेली रक्कम मिळवून देण्यासाठी त्याच्याकडे दोन लाख रूपयांची मागणी करणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले. देवीदास हिरामण कारंडे, असे या सहायक पोलिस निरीक्षकाचे नाव असून, काही महिन्यांपूर्वीच ते रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात रूजू झाले होते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनूसार, या प्रकरणातील तक्रारदार हा ठेकेदार असून, त्याचा रांजणगाव एमआयडीसीतील एका प्रतिथयश कंपनीत कामगार पुरविण्याचा ठेका आहे. या कामापोटी कंपनीकडे थकीत असलेली रक्कम मिळवून देण्याबरोबरच कंपनीत असलेला ठेका पुढेही चालू ठेवण्यासाठी आणि याबाबत कंपनीकडून काही तक्रार आली तरी कारवाई न करण्यासाठी कारंडे यांनी तक्रारदाराकडे दोन लाख रूपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयाकडे गेल्या बुधवारी (ता. ८) तक्रार दिली होती.
एलसीबीचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक कारंडे यांनी दोन लाख रूपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना सायंकाळी ताब्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे युनिटचे पोलिस निरीक्षक विरनाथ माने हे पुढील तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00390 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..