ब्लॉक बसविण्याचे काम कासव गतीने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्लॉक बसविण्याचे काम कासव गतीने
ब्लॉक बसविण्याचे काम कासव गतीने

ब्लॉक बसविण्याचे काम कासव गतीने

sakal_logo
By

शिरूर, ता. १३ : शहरातील मुख्य पेठांतील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामानंतर दुतर्फा सिमेंट ब्लॉक बसविण्याचे सुरू असलेले काम कासव गतीने होत आहे. ठिसूळ झालेले ब्लॉक बसवतानाच फुटत आहेत. या कामांत नियोजनाचा अभाव जाणवत असून, बसविण्यासाठी आणलेले ब्लॉकचे ढीग आठ दिवस रस्त्यांत पडून राहात आहेत. यामुळे मुळातच अरुंद रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे.

काही महिन्यांपूर्वी शहराच्या मुख्य पेठेतील महात्मा गांधी पथ व पंडित जवाहरलाल नेहरू रस्ता या मुख्य रस्त्यांबरोबरच इतर भागांतील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. भूमीगत गटारांच्या चेंबरवरही डांबरीकरण केले. ही बाब उघड झाल्यावर आता पुन्हा हे चेंबर खुले करताना ठिकठिकाणी डांबरीकरण खोदले जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुख्य रस्त्याला खड्डे पडले आहेत.

डांबरीकरणानंतर, रस्त्याची उंची वाढल्याने दोहोबाजूंचे सिमेंट ब्लॉक काढून तेथे नव्याने ब्लॉक बसविण्याचे काम सध्या चालू आहे. या कामात देखील मोठे अनियोजन दिसत असून, धिम्या गतीने सुरू असलेल्या या कामाचा रस्त्याकडेच्या नागरिकांना, दुकानदारांना व विशेषतः वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जुने ब्लॉक काढून रस्त्यातच टाकले गेले असतानाच नवीन ब्लॉकचे ढीग ठिकठिकाणी लावून ठेवलेले आहेत. काही ठिकाणी तर आठ ते दहा दिवसांपासून हे ढीग लावलेले असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.

काम रगडून नेल्याचा नागरिकांचा आरोप
शहराच्या मुख्य पेठांतील रस्ते मुळातच अरुंद असून, हे ब्लॉक बसविताना ते मूळ रस्त्याच्या उंचीपेक्षा अधिक उंचीचे असल्याने रस्ते आणखी अरुंद होणार असल्याचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला. याबाबत नगर परिषदेच्या अधिकारी किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधला असता, समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचे व सुरू असलेले काम तसेच रगडून नेले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला.


नगर परिषद प्रशासनाने यात हस्तक्षेप करून ब्लॉकच्या कामाची चौकशी करावी. निकृष्ट दर्जाच्या कामाची आपल्या यंत्रणेमार्फत चौकशी करून तातडीने हे काम थांबवावे. मूळात जुने ब्लॉक काढण्याचे काही कारण नव्हते. रस्त्याची उंची व त्या ब्लॉकची उंची साधून नियोजन करता आले असते. नागरिकांच्या कररूपातील पैशांचा अपव्यय होत आहे.
- संदीप कडेकर, माजी अध्यक्ष, शिरूर शहर मनसे

रस्त्याच्या किंवा दुतर्फा बसविल्या जाणाऱ्या ब्लॉकच्या गुणवत्तेबाबत तक्रारी असतील तर नागरिकांनी त्या कळवाव्यात. चालू कामाची तातडीने नगर परिषदेच्या प्रशासनाकडून व तज्ज्ञांकडून पाहणी केली जाईल. त्यात निकृष्टता आढळली तर तातडीने काम थांबवून चौकशी केली जाईल. पावसामुळे कामात व्यत्यय येत असावा. तसे असेल तर नागरीकांनी सहकार्य करावे.
-ॲड. प्रसाद बोरकर, मुख्याधिकारी, शिरूर नगर परिषद
00716

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00439 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..