
महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
शिरूर, ता. १६ : मोगऱ्याच्या दरवळाने सुगंधित गाभारा... गुलाब, सोनचाफ्याची शाही सजावट... सोन्या - चांदीच्या अलंकाराने सजलेले देवघर... भरजरी वस्त्रांचा साज... अन गळ्यातील दूर्वमालांनी ‘श्रीं’च्या साजिऱ्या रूपात पडलेली भर... वरूणराजाने उसंत घेताच आज संकष्टीचे औचित्य साधून गणराजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली. रांजणगावात (ता. शिरूर) महागणपतीच्या दर्शनासाठी दूरदूरच्या भाविकांनी पहाटेपासूनच उपस्थिती लावली होती.
गेल्या आठवडाभर संततधार कोसळणाऱ्या जलधारांनी काल दुपारपासूनच काहीशी विश्रांती घेतल्याने आणि आज शनिवारचा सुटीचा दिवस असल्याने संकष्टी चतुर्थीला भाविकांची गर्दी होणार हे लक्षात घेऊन श्री रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टने भाविकांच्या सुविधेसाठी सर्व नियोजन केले होते. डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, ॲड. विजयराज दरेकर हे विश्वस्त, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशेबनीस संतोष रणपिसे, पुजारी प्रसाद कुलकर्णी व मकरंद कुलकर्णी हे यावेळी उपस्थित होते. मंदिर परिसराच्या स्वच्छतेबरोबरच; पावसामुळे परिसरात झालेले खड्डे तात्पुरते बुजवून, वाहन पार्किंगच्या जागेचीही डागडुजी केली होती.
आज संकष्टी चतुर्थीनिमित्त, पहाटे महागणपतीला अभिषेक घालण्यात आला. दुपारी १२ वाजता महापूजेनंतर महानैवेद्य दाखविला. त्यानंतर भाविकांसाठीही दिवसभर खिचडीचा महाप्रसाद वाटला. यावेळी रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी सव्वासात वाजता विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत श्रीं ची सामुदायिक आरती झाली.
Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00444 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..