गणेशोत्सवाला सामाजिकतेची जोड द्या : गवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवाला सामाजिकतेची जोड द्या : गवारी
गणेशोत्सवाला सामाजिकतेची जोड द्या : गवारी

गणेशोत्सवाला सामाजिकतेची जोड द्या : गवारी

sakal_logo
By

शिरूर, ता. २७ : आगामी गणेशोत्सव विधायक उपक्रमांनी साजरा करताना यंदाच्या गणेशोत्सवाला सामाजिकतेची जोड द्या, असे आवाहन शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांनी व्यक्त केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिरूर पोलिस ठाण्यांतर्गत झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत गवारी बोलत होते. तहसीलदार प्रशांत पिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, नगर परिषदेचे मुख्याधिकारी ॲड. प्रसाद बोरकर, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एस. के. माने, सहायक अभियंता एम. एस. बेसुळके, पुणे जिल्हा दक्षता समितीच्या सदस्या शोभना पाचंगे पाटील, शिरूर बाजार समितीचे संचालक प्रवीण चोरडिया आदींसह समितीचे सदस्य, शहर व परिसरातील गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गणेशोत्सव उत्साहात, जल्लोषात साजरा झाला पाहिजे, यात दुमत असण्याचे कारण नाही. पण उत्साह म्हणजे स्वैराचार किंवा झुंडशाही नव्हे याचीही प्रत्येकाने जाणीव ठेवावी, अशी सूचना गवारी यांनी केली. ते म्हणाले, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मर्यादित संख्येमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिस बळ अपुरे पडणार आहे. अशावेळी शांतता समितीच्या सदस्यांनी गणेश मंडळातील कार्यकर्त्यांशी समन्वय साधावा. त्यांना कायद्याची माहिती करून द्यावी. उत्साहाच्या भरात कायद्याचे उल्लंघन झाले, नकळत एखादा गुन्हा दाखल झाला तर अशा कार्यकर्त्यांचे भवितव्य उद्‍ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे उत्सवात उत्साह जरूर दाखवा पण त्यातही संयम आणि समन्वय ठेवा.
या वेळी राऊत म्हणाले, ‘‘प्रत्येकाने सामाजिक सलोखा अबाधित राहील यासाठी योगदान द्यावे. बाहेरील व्यक्तींमुळे उत्सवाला गालबोट लागणार नाही, याचीही खबरदारी घ्या.’’ तहसीलदार पिसाळ म्हणाले, ‘‘गणेशोत्सव नियंत्रणात्मक पद्धतीने साजरा करण्याऐवजी विकासात्मक, प्रबोधनात्मक पद्धतीने साजरा करावा.’’ मुख्याधिकारी ॲड. बोरकर म्हणाले, ‘‘गणेशोत्सवादरम्यान राष्ट्रीय कर्तव्य म्हणून, आधार कार्डला मतदान ओळखपत्र लिंक करण्याबाबत जागृती करावी.’’
सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव यांनी प्रास्ताविक, पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार यांनी सूत्रसंचालन केले. उपनिरीक्षक सुनील उगले यांनी आभार मानले.

बैठकीत ठरलेले नियम
गणेश मूर्ती स्टॉल फक्त रयत शाळेच्या मैदानावर लागतील.
एक खिडकी योजनेतून सर्व प्रकारच्या परवानग्या मिळतील.
विविध परवाने किंवा शंकानिरसनासाठी हेल्पलाइन क्रमांक १८००२३३२१२३
गणेश मंडळांनी मागणी अर्ज दिल्यास तत्काळ तात्पुरत्या स्वरूपाचे वीज कनेक्शन
रस्त्याला अडथळे ठरतील असे मंडप उभारण्यास प्रतिबंध
ध्वनिप्रदूषण प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना
विसर्जन मिरवणुकीचा रथ आटोपशीर असावा

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00550 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..