मेजर टाकळकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेजर टाकळकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मेजर टाकळकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मेजर टाकळकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

sakal_logo
By

शिरूर, ता. ७ : भारत माता की जय आणि वंदे मातरम चा आसमंतात दुमदूमणारा गजर... देशभक्तीपर गीतांच्या सुरावटी... आर्मीच्या बॅंडपथकाच्या बिगुल ची अंगावर शहारे आणणारी धून... धीरगंभीर वातावरणाला छेदणाऱ्या बंदूकीच्या फैरी... अन् ‘मेजर बबनराव टाकळकर अमर रहे’ चा काळीज पिळवटून टाकणारा जयघोष... काश्मीरमधील श्रीनगर येथे देशसेवा बजावताना वीरमरण आलेले ‘सीआरपीएफ’चे मेजर बबनराव गेणभाऊ टाकळकर यांच्यावर त्यांच्या पिंपरखेड (ता. शिरूर) या मूळगावी आज मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
केंद्रीय राखीव पोलिस फोर्स (सीआरपीएफ) मध्ये कार्यरत असलेले पिंपरखेड येथील मेजर बबनराव टाकळकर हे श्रीनगर येथे कर्तव्यावर होते. सेवेदरम्यान, अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना जम्मूतील आर्मी च्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान, मंगळवारी (ता. ६) पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव, आज पहाटे दोनच्या सुमारास विमानाने मुंबईत व तेथून सीआरपीएफच्या खास वाहनातून सकाळी सहाच्या सुमारास पिंपरखेड येथे आणण्यात आले. आपल्या गावच्या सुपूत्राला वीरमरण आल्याने गावात सर्व व्यवहार बंद ठेवून दुखवटा पाळण्यात आला. या घटनेने गाव सुन्न झाला होता. मेजर टाकळकर यांचे पार्थिव काही काळ त्यांच्या निवासस्थानी ठेवल्यानंतर फुलांनी सजविलेल्या स्वर्गरथातून अंत्ययात्रा काढण्यात आली. तिरंगी झेंडे लावलेल्या या स्वर्गरथाच्या दर्शनी बाजूला मेजर टाकळकर यांचे मोठे छायाचित्र लावले होते. यावेळी देशभक्तीपर गीते वाजविण्यात आली. अंत्यंयात्रेत पिंपरखेड व परिसरातील अनेक गावांतून लोक आले होते. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘वीरजवान बबनराव टाकळकर अमर रहे’, ‘जबतक सूरज चांद रहेगा, मेजर बबनराव तुम्हारा नाम रहेगा’ च्या गर्जनांनी आसमंत दुमदूमला.
अंत्यसंस्कारापूर्वी, लष्करी जवानांनी हवेत बंदूकीच्या पाच फैरी झाडून मेजर टाकळकर यांना मानवंदना दिली. लष्कराच्या वतीने सुभेदार मेजर दिनकर पाटील यांनी तसेच भाजप किसान मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय थोरात, निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, शिरूरचे पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले, मंडलाधिकारी एकनाथ ढाके, गावकामगार तलाठी अमोल थिगळे यांनी श्रद्धांजली वाहिली.
मेजर बबनराव टाकळकर (वय ५५) हे गेले तब्बल ३१ वर्षे सीआपीएफ मध्ये कार्यरत होते. सन १९९१ ला सीआरपीएफ च्या सेवेत आल्यानंतर त्यांनी पंजाब, इंफाळ, नवी दिल्ली, त्रिपूरा, छत्तीसगड, मुंबई येथे सेवा बजावली. सध्या काश्मीरमधील श्रीनगर येथे ते कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

मेजर बबनराव टाकळकर

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00581 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..