‘घोडगंगा’ची रणधुमाळी पुन्हा सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘घोडगंगा’ची रणधुमाळी पुन्हा सुरू
‘घोडगंगा’ची रणधुमाळी पुन्हा सुरू

‘घोडगंगा’ची रणधुमाळी पुन्हा सुरू

sakal_logo
By

शिरूर, ता. १७ : अतिवृष्टीच्या कारणास्तव स्थगित झालेल्या आणि पुढे न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीची प्रक्रिया ज्या टप्प्यावर थांबली, त्याच टप्प्यापासून पुढे निवडणूक कार्यक्रम राबवावा, असा आदेश आज उच्च न्यायालयाने दिला.
घोडगंगा कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू होऊन ११० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, ३१ जुलै रोजी होणारी निवडणूक अतिवृष्टीच्या कारणास्तव राज्य सरकारने स्थगित केली होती. तीस सप्टेंबरनंतर या निवडणुका आहे त्या टप्प्यावरून पुढे घेण्याबाबत सरकारने सूचित केले होते. त्यामुळे जिथे कार्यक्रम थांबला, तिथून पुढे प्रक्रिया सप्टेंबरनंतर राबविली जाणार होती. या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केलेल्यांना माघारीसाठी तीन दिवसांची मुदत बाकी होती. दरम्यान, या निवडणुकीसाठी शिरूर गटातून माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निवडणूक स्थगितीदरम्यान ११ ऑगस्टला त्यांचे निधन झाल्याने निवडणूक प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, या निवडणुकीचा नव्याने कार्यक्रम घेण्याचे सहकार खात्याने ठरविले होते. मात्र, यास कारखान्याच्या वतीने आक्षेप घेण्यात आला होता. कोरोनामुळे मुळातच दोन वर्षे निवडणूका लांबल्या असल्याने आता पुन्हा पहिल्यापासून निवडणूक प्रक्रिया राबविल्यास त्यात वेळ व खर्चाचा अपव्यय होईल, असे कारखान्याकडून उच्च न्यायालयात सांगण्यात आले होते. त्यानुसार आज उच्च न्यायालयाने जिथे निवडणुका थांबल्या, तिथूनच त्या घ्याव्यात, असे आदेश दिले.
प्रत्यादेश रद्द झाल्याने जेथपर्यंत प्रक्रिया झाली होती, तेथून पुढे निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी सांगितले. उर्वरित प्रक्रियेचा फेरनिवडणूक कार्यक्रम तयार करून तो निवडणूक प्राधिकरणाला सादर केला जाईल व त्यांच्या मान्यतेनंतर उर्वरित काळासाठीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यमान संचालक मंडळाला मूळात सात वर्षे झाली आहेत. त्यामुळे निवडणूका होण्याबाबत आम्ही आग्रही होतो. नव्याने प्रक्रियेचा घाट घालून निवडणूका पुढे ढकलण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता. मात्र, आमचा न्यायदेवतेवर विश्वास होता. न्यायदेवतेने योग्य न्याय देताना विरोधकांच्या या अडथळ्यांना व कारवायांना जोरदार दणका दिला आहे. येनकेन प्रकारे निवडणूक कार्यक्रम लांबविण्याचा विरोधकांचा डाव उच्च न्यायालयाच्या निकालामुळे असफल ठरला आहे. फेरनिवडणूक कार्यक्रमातून सभासदांवरच खर्चाचा बोजा पडला असता, तो वाचला.
- ॲड. अशोक पवार, आमदार तथा अध्यक्ष,
रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना

निवडणूक प्रक्रियेदरम्यान माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे निधन झाल्याने व ते या निवडणुकीतील महत्त्वाचे घटक असल्यानेच फेरनिवडणूक घेण्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ठरविले होते आणि ते रास्तही होते. मात्र, त्याविरोधात कारखान्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. परिस्थिती नसताना कारखान्याचा न्यायालयीन कामकाजावर मोठा खर्च झाला. त्यास जबाबदार कोण?
- ॲड. सुरेश पलांडे, माजी संचालक,
घोडगंगा सहकारी साखर कारखाना