कान्हूर मेसाई पावसाचे थैमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कान्हूर मेसाई पावसाचे थैमान
कान्हूर मेसाई पावसाचे थैमान

कान्हूर मेसाई पावसाचे थैमान

sakal_logo
By

शिरूर, ता. १८ : विजांच्या कडकडाटात, वादळी वाऱ्यासह रात्री नऊ वाजता पावसाला सुरुवात झाली. थोड्याच वेळात पावसाने रौद्ररूप धारण केले. तब्बल तीन तास थैमान घातलेल्या पावसाने खर्डे लवण व ढगेवाडी जवळील बांध पाण्याने तुडूंब भरल्याने अचानक फूटले आणि त्या लोंढ्याने इतर बांध फुटून पाण्याचा लोंढा गावात आला. असा पाऊस उभ्या जन्मात बघितला नव्हता. पहिल्यांदाच ही परवड झाली. गावठाणात पाणी मावत नव्हतं... ७३ वर्षीय भाऊसाहेब तळोले बोलत होते आणि त्यांच्या बोलण्यातून, कान्हूर मेसाई (ता. शिरूर) व परिसरात मध्यरात्री झालेल्या ढगफूटीसदृश पावसाचे अंगावर शहारे आणणारे भयचित्र उभे राहात होते.
पावसामुळे शेळ्या-मेंढ्या पुराच्या पाण्याबरोबर आलेल्या मातीत अक्षरशः गाडल्या गेल्या हे सांगताना, अत्यंत हताश झालेले ७८ वर्षीय बाबू जयवंत थोरात हे वृद्ध पत्नीसह चिखलाच्या ढिगाऱ्यात गाडल्या गेलेल्या बकऱ्यांना बाहेर काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होते. पावसाच्या या हाहाःकाराने त्यांचे दगड, वीटा, मातीचे घर जमीनदोस्त झाले. आज सकाळी, या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रशांत पिसाळ, गटविकास अधिकारी अजित देसाई यांनी मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवकांसह कान्हूर ला भेट दिली, तेव्हा अनेकांनी त्यांच्यासमोर कैफियत मांडली.
घुले वस्तीजवळील बांध फुटल्यानंतर पाण्याचा मोठा लोंढा कान्हूर गावठाणात शिरला. यात थोरात यांचे घर भुईसपाट झाले. पावसाच्या हाहा:कारमुळे ते जागेच असल्याने वेळीच सावध होऊन झाडाच्या आडोशाला गेले. घराशेजारील गोठादेखील वाहून गेला. त्यात पाच करडांसह पाच मोठ्या शेळ्या होत्या. घराची भिंत गोठ्यावर कोसळली त्याखाली अडकून दोन शेळ्या मृत्युमुखी पडल्या. तर दोन मोठ्या शेळ्या पुराबरोबर आलेल्या मातीखाली गाडल्या गेल्या. उर्वरित पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेल्या.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज या बाधित ग्रामस्थांची भेट घेऊन दिलासा दिला. या परिसरातील नुकसानीचे पंचनामे करून, दिवाळीच्या तोंडावर तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सरपंच चंद्रभागा विठ्ठल खर्डे यांनी केली. रात्री एकनंतर पावसाने थोडी उघडीप दिली असून, घरांची पडझड होत असल्याने ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसह अनेक कुटुंबांनी उघड्यावर रात्र जागून काढली असल्याचे बबन (दादा) शिंदे यांनी सांगितले.

किराणा माल, जीवनावश्यक वस्तू, पडलेली घरे आणि वाहून गेलेली जनावरे मिळून सुमारे १० कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरवात केली असून, दोन ते तीन दिवस पंचनाम्यात जातील. त्यानंतर नुकसानीचा नेमका आकडा समजू शकेल.
- राम जगताप, सहायक गटविकास अधिकारी

गावातील ओढ्यावरील पुलाचे संरक्षक कठडे पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेल्याने धोकादायक झालेल्या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी सरपंच उत्तम व्यवहारे यांनी केली. सोनेसांगवी येथील पोपट गोपाळा डांगे यांची दुभती गाय वीज कोसळल्याने मृत्युमुखी पडली. कवठ्यातील संतोष देशमुख यांचे घरही पावसामुळे पडले.

01229, 01231