अखेर जांबूत येथे बिबट्या जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर जांबूत येथे बिबट्या जेरबंद
अखेर जांबूत येथे बिबट्या जेरबंद

अखेर जांबूत येथे बिबट्या जेरबंद

sakal_logo
By

शिरूर, ता. २२ : जांबूत (ता. शिरूर) येथे बिबट्याने, महाविद्यालयीन युवतीवर हल्ला करून तिला ठार केल्याच्या घटनेच्या दहा दिवसानंतर आज पहाटे त्या परिसरात एक बिबट्या वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. जोरी वस्तीजवळ पकडलेल्या या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले.
बिबट्याच्या हल्ल्यात युवती मृत्युमुखी पडल्यानंतर वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी या परिसरात १८ पिंजरे लावले होते. तरीही बिबट्या हुलकावणी देत असल्याने ग्रामस्थांत भितीचे वातावरण होते. बिबट्याच्या मानवावरील हल्ल्याच्या घटनेने हवालदील झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाच्या कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.
दरम्यान, आज पहाटे पाचच्या सुमारास जोरी वस्तीवरील पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे दिसून आल्यावर स्थानिकांनी सुटकेचा निःशास टाकला. पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या मादी प्रवर्गातील असून आठ वर्ष वयाचा हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला आहे, अशी माहिती शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले. या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याची संख्या वाढलेली असून, एक बिबट्या पकडला म्हणून लगेच पिंजरे हलवू नयेत, अशी मागणी जांबूतचे सरपंच दत्तात्रेय जोरी यांनी केली.

01272