विरोधकांचा केला नियोजबद्ध ‘करेक्ट कार्यक्रम’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरोधकांचा केला नियोजबद्ध ‘करेक्ट कार्यक्रम’
विरोधकांचा केला नियोजबद्ध ‘करेक्ट कार्यक्रम’

विरोधकांचा केला नियोजबद्ध ‘करेक्ट कार्यक्रम’

sakal_logo
By

शिरूर, ता. ७ : सद्यस्थितीत तोट्यात असला तरी कारखाना यांच्याच ताब्यात सुरक्षित राहू शकतो आणि हेच कारखाना सुरळीत चालवू शकतात, याबाबत ऊसउत्पादक सभासदांना असलेला विश्वास, हा विश्वास द्विगुणीत करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिगरबाज ठामठोक फळीने रात्रंदीवस केलेला प्रचार, राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी उभे केलेले पाठबळ, स्थानिक नेत्यांचे मनोमिलन आणि घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक (स्व.) रावसाहेबदादा पवार यांची पुण्याई, या बळावर आमदार ॲड. अशोक पवार यांनी सलग पाचव्यांदा ‘शिरूर तालुक्याच्या सहकारात मीच सम्राट’ असल्याचे रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याच्या निकालातून दाखवून दिले. विरोधकांना मिळालेल्या एका जागेने राष्ट्रवादीच्या लखलखीत यशाला काहीसे गालबोट लागले असले; तरी विरोधकांची क्रांतीची मशाल शांत झाल आणि त्यांच्या तोंडची साखर कडू झाली.
आमदार पवार यांच्या ध्येयधोरणामुळे व मनमानी कारभारामुळे कारखान्याची वाट लागली, असा मुद्दा विरोधकांनी चांगलाच तापवला होता. त्यासाठी गावपातळीवर रान पेटवून अशोक पवार यांच्या मार्गात अनेक गतिरोधक उभारले होते. मात्र, त्या गतिरोधकांना ठेचकाळून तेच तोंडावर पडले. आमदार पवार यांचा खासगी साखर कारखान्याशी संबंध असून, त्या कारखान्याची भरभराट व्हावी, म्हणूनच त्यांनी ‘घोडगंगा’च्या कारभाराकडे दूर्लक्ष केले. त्यातून कारखाना तोट्यात जावून कर्जबाजारी झाल्याचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला होता. परंतू, आमदार पवार यांनी या आरोपाला चोख उत्तर देताना कारखान्यावरील कर्जाला केवळ भाजप सरकारची ध्येयधोरणे कारणीभूत असल्याचे प्रत्युत्तर दिले. आघाडी सरकारच्या काळात कारखान्याने सुमारे शंभर कोटी रूपयांचा को-जन प्रकल्प उभारला. परंतु, त्यानंतर आलेल्या भाजप सरकारने हा प्रकल्प तीन वर्षे पडून ठेवला. दोन ओळींचा वीज खरेदी करार करण्यास टाळाटाळ केली. नंतरही कमी किंमतीत वीजखरेदी केली. त्यामुळे कर्ज आणि व्याजाचा मोठा भूर्दंड कारखान्याला व पर्यायाने ऊस उत्पादक सभासदांना सोसावा लागल्याचा मुद्दा त्यांनी प्रत्युत्तरादाखल मांडला, जो सामान्य उसउत्पादक सभासदांना भावला. त्यावर विश्वास व्यक्त करीत ऊसउत्पादकांनी त्यांच्या पॅनेलला भरभरून मते दिली.
‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत आमदार ॲड. अशोक पवार यांच्या नेतृत्वाखालील’ शेतकरी विकास पॅनेल असे जाहिर करत आमदार पवार यांनी ऐन निवडणूकीत एकमुखी नेतृत्वाचा नारा दिला. काही दिग्गजांच्या उमेदवाऱ्या कापून त्यांना धक्का दिला. त्यांच्या नाराजीचा मुद्दा पुढे येताच ते ज्यांचे नेतृत्व मानतात, त्या मोठ्या नेत्याला प्रचारासाठी पाचारण करीत त्यांची नाराजी मोडून काढली. प्रचाराच्या सांगतेला थेट विरोधी पक्षनेते अजित पवार यांना बोलावून तडाखेबंद प्रचारावर कळस चढविला. गेली २५ वर्षे कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून निर्माण केलेला होल्ट आणि प्रोफेशनल पद्धतीने निवडणूक करण्याचे तंत्र त्यांनी नेत्रदीपक विजयातून सिद्ध केले. प्रत्येक निवडणुकीत एक सूत्रबद्ध शैली आणि आक्रमकतेबरोबरच आर्थिक, बौद्धिक पातळीवर नियोजनबद्ध प्रभावी प्रचारयंत्रणा, असा इव्हेंट वापरून त्यांनी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला.
साखर कारखानदारीतील पुरेपूर जाण, एकहाती नेतृत्वातून कारभारात आणलेली सुसूत्रता, प्रशासनावरील पकड, बलाढ्य पण छूपी निवडणूक यंत्रणा, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचारांना मानणारा ऊसउत्पादक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांच्या नेतृत्वाला जाणणारा शेतकरी समाज आणि आमदारकीच्या माध्यमातून केलेली कामे सर्वसामान्य ऊसउत्पादकांसमोर मांडून अशोक पवार यांनी हे निर्भेळ यश मिळविले.
कारखाना कर्जबाजारी असल्याचा त्यांचा मुद्दा आमदार पवार यांनी पद्धतशीरपणे त्यांच्यावरच उलटवला; तर खासगी कारखान्याशी संबंधांच्या मुद्द्याचे थेट अजित पवार यांच्यासह सामान्य शेतकऱ्यांनीही अप्रत्यक्षरीत्या समर्थनच केल्याचे निकालातून दिसून आले. कारण, एवढ्या मोठ्या प्रमाणात या तालुक्यात असलेला ऊस एकटा ‘घोडगंगा’ गाळू शकतो का? हा अजित पवार यांचा सवाल सामान्य ऊसउत्पादकांना भावल्याचे प्रतिबिंब निकालात उमटले. कारखान्यावरील कर्ज, मृत सभासदांच्या वारसाची रखडलेली नोंद, कामगारांचे रखडलेले पगार, स्वतःच्या शिक्षण संस्थेला दिलेली कारखान्याची पाच एकर जागा, उसाला मिळत असलेला कमी बाजारभाव आणि एकाधिकारशाही व मनमानी कारभाराच्या टिकेवर अशोक पवार यांनी चपखल उत्तरे देऊन विरोधकांची बोलती बंद केली. ऐन निवडणुकीत केलेल्या वातावरणनिर्मीतीमुळे नाही म्हणायला विरोधकांना समाधानकारक मते मिळाली, मात्र ती विजयाप्रत घेऊन जाण्यास असमर्थ ठरली. माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या ऐन निवडणूकीत झालेल्या निधनाची सहानुभूतीही त्यांना मिळवता आली नाही. पाचर्णे तर आता नाहीतच, पण विरोधकांनाही एकहाती संपविण्याची किमया साधण्यात यशस्वी ठरलेल्या अशोक पवार यांची भावी राजकीय वाटचाल या निकालाने आणखी उज्ज्वल झाली आहे.

सोळा सुगरणी आणि स्वयंपाक आळणी
निवडणुकीआधी विरोधकांनी चांगली वातावरणनिर्मीती केली होती. शांतीत क्रांती करण्याचे धोरणही त्यांनी अवलंबिले होते. या छुप्या धोरणाची परिणीती त्यांनी चांगली लढत दिल्यात दिसून आली. परंतु, आपापसांतील अवमेळामुळे ध्येयापासून ते दूरच राहिले. सोळा सुगरणी आणि स्वयंपाक आळणी, अशी विरोधकांची गत झाली. अशोक पवार यांचा कारभार कसा चुकीचा आहे, हे सविस्तरपणे आणि सूत्रबद्ध पद्धतीने मांडत त्यांनी वातावरण तापविले होते. परंतु, त्यात हाती काहीच न लागता पोळलेले हात चोळत बसण्याची वेळ त्यांच्यावर आली.