टाकळी हाजीत बछड्याचा उपसामार झाल्यामुळे मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टाकळी हाजीत बछड्याचा
उपसामार झाल्यामुळे मृत्यू
टाकळी हाजीत बछड्याचा उपसामार झाल्यामुळे मृत्यू

टाकळी हाजीत बछड्याचा उपसामार झाल्यामुळे मृत्यू

sakal_logo
By

शिरूर, ता. १६ : टाकळी हाजी-होणेवाडी (ता. शिरूर) येथील मक्याच्या शेतात मंगळवारी (ता. १५) दुपारी एक वर्षीय बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले आहे.
टाकळी हाजीच्या होणेवाडीतील सावकार भाऊ घोडे यांच्या शेतात कांदा चाळीत भरण्याचे काम चालू असताना जवळच्याच मक्याच्या शेतातून बिबट्याच्या विव्हळण्याचा आवाज आल्याने काही कामगारांनी मक्याच्या पिकात जाऊन पाहिले असता बिबट्याचे पिलू विव्हळत होते. कामगार जवळ गेले तरी त्याची फारशी हालचाल न झाल्याने कामगारांनी शेतमालकाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर गोरक्ष सावकार घोडे यांनी तातडीने वनविभागाला याबाबत कळविले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सावित्राशेठ थोरात यांनीही पोलिसांना याबाबत सांगितले.
दरम्यान, दुपारी शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर व पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले यांनी वनकर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. मलूल झालेल्या या बिबट्याला उपचारासाठी हलविण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. रात्री उशिरा शिरूर येथे शवविच्छेदन केले असता उपासमारीमुळे या बछड्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. सुमारे एक वर्ष वयाच्या या बछड्याच्या पोटात अन्नाच एक कणदेखील आढळला नसल्याचे म्हसेकर यांनी सांगितले. मादीने सोडून दिल्यामुळे किंवा ताटातूट झाल्यामुळे गेले काही महिने हा बछडा एकटाच फिरत असावा. अद्याप त्याला शिकारीचे ज्ञान अवगत झालेले नसावे. आईपासून दुरावल्याने अन्नपाण्यावाचून हाल झाल्याने तो अशक्त होऊन गतप्राण झाला असावा, असे म्हसेकर यांनी स्पष्ट केले. रात्री उशिरा बछड्याच्या मृतदेहाचे दहन करण्यात आले.