मोबाईल चारट्यांचे टोळके रांजणगाव परिसरात जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल चारट्यांचे टोळके
रांजणगाव परिसरात जेरबंद
मोबाईल चारट्यांचे टोळके रांजणगाव परिसरात जेरबंद

मोबाईल चारट्यांचे टोळके रांजणगाव परिसरात जेरबंद

sakal_logo
By

शिरूर, ता. २१ : रात्रपाळीचे काम संपवून घरी परतणाऱ्या कामगाराला फायटरचा धाक दाखवीत धमकावून त्याचा मोबाईल चोरून नेणाऱ्या तिघांना रांजणगाव (ता. शिरूर) एमआयडीसीच्या पोलिस पथकाने पाठलाग करून पकडले. कामगाराचा चोरून नेलेला मोबाईलही त्यांच्याकडून जप्त केला. या गुन्ह्यात दोन अल्पवयीनांचाही समावेश असून, त्यांनाही ताब्यात घेतले आहे.
देवानंद विलास धवसे (वय २१), शुभम बाळासाहेब कुंभार (वय २३) व अभिजित संतोष कांदळकर (वय १९, तिघे रा. कवठे येमाई, ता. शिरूर) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे असून, त्यांना शिरूर न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली. दोघा अल्पवयीनांना बालसुधारगृहात पाठविले.
रांजणगाव एमआयडीसीत गुरुवारी (ता. १७) रात्री उशिरा हा प्रकार घडला होता. रात्रपाळीचे काम संपवून घरी जाणाऱ्या कामगाराला विनाक्रमांकाच्या दोन दुचाकीहून आलेल्या पाच जणांच्या टोळक्याने धमकावले. फायटरचा धाक दाखवीत मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल चोरून पलायन केले.
या घटनेनंतर घाबरलेल्या कामगाराने तातडीने रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेऊन त्यांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी या कामगाराच्या तक्रारीची दखल घेत गस्तीवर असलेल्या पथकाला घटनेचा तपशिल सांगून कार्यवाहीच्या सूचना दिल्या. पोलिस हवालदार विलास आंबेकर, विजय सरजिने, पांडुरंग साबळे, राजेश ढगे, सूरज वळेकर, शुभम मुत्याळ या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठून स्थानिक माहितीच्या आधारे गुन्हेगारांचा ठावठिकाणा शोधला. विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून फिरणाऱ्या पाचजणांना पोलिसांनी हटकले व थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी दुचाकी वेगात दामटल्या. त्यादरम्यान, पथकाने पोलिस वाहनातून पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांनी सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. कामगाराचा चोरलेला मोबाईलही पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केला.