दहशत माजविणारा बिबट्या जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहशत माजविणारा बिबट्या जेरबंद
दहशत माजविणारा बिबट्या जेरबंद

दहशत माजविणारा बिबट्या जेरबंद

sakal_logo
By

शिरूर, ता. २४ : गेले अनेक दिवसांपासून शिरूर पंचक्रोशीत उच्छाद मांडलेला आणि पाळीव प्राणी, कोंबड्या, कुत्री यांचा फडशा पाडून दहशत माजविणारा बिबट्या वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात आज (ता.२४) पहाटे जेरबंद झाला. अनेकांना उपद्रवी ठरलेला हा बिबट्या पकडला गेल्याने ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला.
शिरूर ग्रामीणसह, बोऱ्हाडे मळा, घोटीमळा, दसगुडे मळा, महाजन मळा, शिक्षक कॉलनी या परिसरात या बिबट्याची दहशत पसरली होती. नाना सगळे व शिरूरच्या हुडको वसाहतीतील काही तरुणांना गेल्या दोन दिवसांत या बिबट्याने दर्शन दिले होते. संध्याकाळ आणि रात्री बरोबरच दिवसाही या बिबट्याचा वावर वाढल्याने व परिसरात त्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने घबराट पसरली होती. सायंकाळनंतर फारसे कुणी घराबाहेर पडण्यास धजावत नव्हते.
याबाबत शिरूरच्या सरपंच स्वाती घावटे, माजी सरपंच नितीन बोऱ्हाडे, तुषार दसगुडे, अमोल वर्पे यांनी पाठपुरावा केल्यानंतर काल दुपारी तीनच्या सुमारास बोऱ्हाडे मळा - रामलिंग रस्त्यावर वनखात्याने पिंजरा लावला होता. मुख्य पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून कोंबडी तर या पिंजऱ्याला जोडलेल्या दुसऱ्या पिंजऱ्यात बिबट्याला आमिष दाखविण्यासाठी शेळी ठेवली होती. गर्द उसाच्या फडात लावलेल्या या पिंजऱ्यात पहाटे साडेपाचच्या सुमारास बिबट्या अडकला. त्यांच्या डरकाळ्यांनी काही तरुणांनी पिंजऱ्याजवळ जाऊन खात्री केली व वनविभागाला कळविले. शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनरक्षक एस. एस. भुतेकर, वनपाल जी. आर. मेहेत्रे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जेरबंद झालेला बिबट्या पूर्ण वाढ झालेला असून, निरोगी असल्याचे म्हसेकर यांनी सांगितले. त्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारा केंद्रात केल्याची माहिती त्यांनी दिली.
-------------------------------------------
01423