
रांजणगावमध्ये कर्जदाराचा खून
शिरूर, ता. २ : फायनान्स कंपनीने दिलेल्या कर्जाची रक्कम हडपण्याच्या उद्देशाने कर्जदाराचा खून करणाऱ्या त्याच फायनान्स कंपनीतील प्रतिनिधीसह दोघांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. खून झालेली व्यक्ती व तीच्या नातेवाईकांबाबत कुठलीही माहिती नसताना केवळ सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करून पोलिसांनी खून झालेल्या व्यक्तीचा शोध लावतानाच खून करणारांच्या मुसक्या आवळल्या.
प्रदीप कैलास पिडगे (वय २०) व भागवत रंगनाथ पिडगे (वय २३, दोघेही रा. आडगाव सुगाव, ता. पूर्णा, जि. परभणी), अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे असून, शिरूर न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत (ता. ५) पोलिस कोठडी दिली. प्रशांता मायाधर साहू (वय २९, रा. बिंधानिमा, ता. तिगिरीया, जि. कटक, ओरिसा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते काही दिवसांपासून रांजणगाव एमआयडीसीतील खासगी कंपनीत कामाला होते. बुधवारी (ता. ३०) रात्री उशिरा एमआयडीसीतील एक्स्प्रो इंडिया व डंकन कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळील मोकळ्या जागेत त्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्याची ओळख न पटल्याने सुरवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. परंतु, शवविच्छेदन अहवालातून डोक्यात दगड घातल्याने जखमी होऊन मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गुरुवारी (ता. १) अज्ञात व्यक्तींविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला.
त्यानंतर दिवसभर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी विविध ग्रुपवर मृत व्यक्तीबाबतची माहिती व्हायरल केली. शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, सहायक फौजदार दत्तात्रेय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ व विजय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा कसून शोध घेतला. त्यातून मृत साहू यांच्या नातेवाइकांचा शोध लागल्यानंतर व त्यांनी मृतदेहाची ओळख पटविली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. मृत साहू याचा मोबाईलही गायब झाल्याने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता मोबाईलमधून मोठी रक्कम इतर खात्यावर वर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातून मृत साहू याने काही दिवसांपूर्वीच एका फायनान्स कंपनीचे ऑनलाइन कर्ज काढल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, संबंधित कंपनीकडील चौकशीतून प्रदीप पिडगे व भागवत पिडगे या संशयितांची नावे समजल्यावर पोलिसांनी त्यांचा माग काढला. ते चाकण एमआयडीसी व भोसरी येथून रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असतानाच रांजणगाव एमआयडीसी पोलिस पथकाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाच्या मदतीने त्यांना पकडले. त्यांनी खुनाची कबुली दिल्याचे पोलिस निरीक्षक मांडगे यांनी सांगितले.
पिडगे हा फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी असून, त्यानेच मृत साहू याला ऑनलाइन कर्ज काढून देण्यास मदत केली होती. कर्जाची रक्कम साहू याच्या खात्यावर जमा झाल्यानंतर पिडगे याने सहकाऱ्यासह रांजणगाव एमआयडीसीत येऊन साहू याला दारू पिण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेले व दारू पाजून त्याचा डोक्यात दगड घालून खून केला व त्याच्याकडील मोबाईल काढून घेऊन ते पळून गेले व पुढे मोबाईलवरून नेट बॅंकींगने एक लाख ३४ हजार इतकी रक्कम पिडगे याने स्वतःच्या बॅंक खात्यावर वर्ग केली, असे मांडगे यांनी सांगितले.