तिरंगी झेंडे फडकावत नायब सुभेदाराची शाही मिरवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिरंगी झेंडे फडकावत नायब सुभेदाराची शाही मिरवणूक
तिरंगी झेंडे फडकावत नायब सुभेदाराची शाही मिरवणूक

तिरंगी झेंडे फडकावत नायब सुभेदाराची शाही मिरवणूक

sakal_logo
By

शिरूर, ता. ४ : वडनेर (ता. शिरूर) ग्रामस्थांनी २६ वर्षे लष्करात सेवा बजावून आलेल्या नायब सुभेदार राजेंद्र दादाभाऊ निचित यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. तिरंगी झेंडे फडकावत, फुलांची उधळण करीत व भारत माता की जय निनादात गावात त्यांची शाही मिरवणूक काढण्यात आली. प्रदीर्घ देशसेवा बजावलेल्या या भुमिपूत्राच्या स्वागताला ग्रामस्थ, विद्यार्थ्यांबरोबर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सन्मान सोहळ्यात सुभेदार राजेंद्र निचित, त्यांच्या पत्नी मनीषा व वडील दादाभाऊ निचित यांचा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मानाचा फेटा बांधून सत्कार केला. शर्मिला निचित व नवनाथ राऊत या आदर्श शिक्षकांना तसेच; वडनेर गावातील आदर्श माता-पिता व ज्येष्ठ नागरिकांचेही वळसे पाटील यांच्या हस्ते यावेळी गौरविण्यात आले.

स्वागत समारंभाला वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, त्रिदल माजी सैनिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप लगड, राष्ट्रवादीच्या माहिती तंत्रज्ञान सेलचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे, सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर गावडे, शिरूर देखरेख संघाचे अध्यक्ष बाबाजी निचित, माजी जिल्हा परिषद सदस्य मथाजी पोखरकर, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, टाकळी हाजीच्या सरपंच अरुणा घोडे, माजी सरपंच दामूअण्णा घोडे, परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष तुकाराम डफळ, शिरूर बाजार समितीचे माजी संचालक सावित्राशेठ थोरात, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष बेलोटे, माळवाडीचे सरपंच सोमनाथ भाकरे, माजी सरपंच सोपानराव भाकरे, आर. बी. गावडे, प्रभाकर खोमणे, अशोक दाते आदी उपस्थित होते.
वडनेरच्या सरपंच शिल्पा निचित यांनी स्वागत केले. उपसरपंच विक्रम निचित यांनी प्रास्ताविक तर नीलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले. नवनाथ निचित यांनी आभार मानले.

उल्लेखनीय कामाबद्दल पाच सेनापदके
लष्करात तब्बल २६ वर्षे प्रदीर्घ देशसेवा बजावून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्या राजेंद्र निचित यांनी लष्करी कारकिर्दीत उल्लेखनिय कामाबद्दल पाच सेनापदके मिळविली. त्यांचा कारगिल युद्धातही विशेष सहभाग होता. संसदेवरील हल्ल्यानंतर लावलेल्या बंदोबस्तात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. भविष्यकाळात, शाळा - महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

भारतीय फौजेतील वीरजवान, घरादाराचा त्याग करून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण करतात. त्यांच्या या सर्वोच्च सेवेमुळे व अतुलनीय त्यागामुळेच केवळ आपण देशवासीय आपापल्या घरात सुरक्षित राहू शकतो, शांतपणे झोपू शकतो. त्यांच्याविषयी प्रत्येक भारतीयाने आदर आणि आस्था बाळगली पाहिजे.
- दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री
01451