प्रत्येकाची व्यक्त होण्याची एक पद्धत ः रोहित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रत्येकाची व्यक्त होण्याची एक पद्धत ः रोहित पवार
प्रत्येकाची व्यक्त होण्याची एक पद्धत ः रोहित पवार

प्रत्येकाची व्यक्त होण्याची एक पद्धत ः रोहित पवार

sakal_logo
By

शिरूर, ता. ४ : ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अवमान होत असल्याच्या निषेधार्थ आमदार रोहित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्थळी केलेल्या आत्मक्लेष आंदोलनाकडे पूर्वनियोजित कार्यक्रमांचे कारण देत पाठ फिरविणारे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आंदोलकांना आत्मक्लेष करण्यापेक्षा झेपावणे आणि पंजेफाड करण्याचा अनाहूत सल्ला दिल्याच्या पार्श्वभूमीवर, आमदार पवार यांनीही संयमी पण ''आमच्याही रक्तात निमूटपणे सहन करणे असू शकत नाही'', सांगत प्रत्येकाची व्यक्त होण्याची एक पद्धत असल्याचे नमूद केले आहे.


आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली वढू बुद्रूक (ता. शिरूर) येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानस्थळी झालेल्या आत्मक्लेष आंदोलनात स्थानिक आमदार या नात्याने ॲड. अशोक पवार हे आवर्जून उपस्थित होते, परंतु या विभागाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे मात्र अनुपस्थित राहिले. यावरून उलट-सुलट चर्चा सुरू होताच डॉ. कोल्हे यांनी खुलासा करताना आंदोलकांनाच अनाहूत सल्ला दिला. ''मतदार संघातील आंदोलनात माझा सहभाग नसल्याबद्दल जे पेव फुटले ते अनाठायी आहे. मी नियोजित कार्यक्रमामुळे येऊ शकलो नाही. मुळात या आंदोलनाची पूर्वकल्पना मला आयोजकांकडून देण्यात आली नव्हती. आंदोलनाची पूर्वकल्पना असती तर माझ्या नियोजित कार्यक्रमात बदल करता आला असता'', असे सांगताना त्यांनी ''मी धडधाकट आहे. त्यामुळे एकाच वेळी पाच आघाड्यांवर पंजेफाड करणाऱ्या शिवसिंहाच्या छाव्याच्या बलिदानस्थळी जाऊन आत्मक्लेष करण्यापेक्षा झेपावणे आणि पेटून उठणे जास्त महत्त्वाचे आहे'', असे आवाहन केले.
-----------------------
दोन्ही नेत्यांचे म्हणणे योग्य
---------------------
वढू बुद्रूक येथील आत्मक्लेष आंदोलनानंतर आपल्याच पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांत काहीशी अवमेळाची स्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनात सहभागी असलेले शिरूरचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली. शिवरायांचा अवमान होत असेल तर कुणी बोलून निषेध नोंदवील; तर कुणी मौन बाळगून निषेध नोंदवील. प्रत्येक शिवभक्त मग तो कुठल्याही पक्षाचा असो, शिवभक्तीने तो निषेध नोंदविलच, असे सांगत त्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी निषेध नोंदविलाच पाहिजे, असे नमूद केले. त्यातून त्यांनी दोन्ही नेत्यांच्या म्हणण्यावर अप्रत्यक्षरित्या योग्य असल्याचा अंगुलिनिर्देश केला.