सोनेसांगवीत बाळासाहेबांची शिवसेनेची मुसंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनेसांगवीत बाळासाहेबांची शिवसेनेची मुसंडी
सोनेसांगवीत बाळासाहेबांची शिवसेनेची मुसंडी

सोनेसांगवीत बाळासाहेबांची शिवसेनेची मुसंडी

sakal_logo
By

शिरूर, ता. २० : शिरूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या आणि वाढत्या औद्योगीकरणामुळे ‘भाव’ वाढलेल्या सोनेसांगवी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची गेल्या १५ वर्षांपासूनची सत्ता मोडीत काढीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने अनपेक्षित मुसंडी मारली. येथे सरपंचपदी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या रेखा मल्हारी काळे निवडून आल्या. पण, विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत पॅनेलने सदस्यपदाच्या निवडीत बहुमत मिळविले.
सोनेसांगवी येथे विद्यमान सरपंच दत्तात्रेय कदम यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत जनसेवा पॅनेल व मल्हारी काळे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत सोनेसांगवी युवा ग्रामविकास परिवर्तन पॅनेलमध्ये चुरशीची लढत झाली. शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत पॅनेलने केवळ चार उमेदवार उभे केले होते. ते चोघेही पराभूत झाले. ग्रामपंचायतीच्या एकूण नऊ जागांवर केवळ जनसेवा पॅनेलने सर्व उमेदवार उभे केले होते. विरोधी सोनेसांगवी युवा ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने सात उमेदवार उभे केले होते. सरपंचपदासह या सातपैकी तीन जागांवर विजय मिळवून त्यांनी सोनेसांगवीत ‘परिवर्तन’ घडविले.
जनसेवा पॅनेलचे प्रमुख दत्तात्रेय कदम यांच्या पत्नी माजी सरपंच अलका कदम व सोनेसांगवी युवा ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे प्रमुख मल्हारी काळे यांच्या पत्नी रेखा काळे यांच्यात सरपंचपदासाठी अटीतटीची लढत झाली. यात काळे यांनी वीस मतांनी विजय मिळविला. त्यांना ९१५; तर कदम यांना ८९५ मते मिळाली. सरपंचपदाच्या रिंगणात असलेल्या नंदा साहेबराव काळे यांना ३०, क्रांती पोपटराव बोऱ्हाडे यांना ८ व सुनीता बाळू डांगे यांना केवळ ५ मतांवर समाधान मानावे लागले. सदस्यपदाच्या निवडणुकीत मात्र जनसेवा पॅनेलने सहा जागा जिंकून बहुमत मिळविले. त्यामुळे सरपंचपद एकीकडे; तर सदस्यांचे बहुमत दुसऱ्या बाजूने, असे त्रांगडे उभे राहिले.
निवडणूक निर्णय अधिकारी संतोष तुकाराम सोनटक्के यांनी निकाल जाहीर केल्यानंतर दोन्ही गटांनी जल्लोष केला. सरपंचपदी रेखा काळे या विजयी झाल्याचे घोषित होताच त्यांचे पती मल्हारी काळे यांनी त्यांना उचलून घेतले तेव्हा उपस्थित त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.


जनसेवा पॅनेलचे विजयी उमेदवार : परशुराम सबाजी डांगे, संजीवनी सुरेश दाते, दीपाली शिवाजी शेळके, रमेश रेवाजी बोऱ्हाडे, आनंदा बाजीराव डांगे, सुनंदा तुकाराम डांगे. सोनेसांगवी युवा ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार : योगेश शिवाजी टाकळकर, पूजा राहुल म्हस्के, प्रमिला विलास काळे.फेरमतमोजणीही निकाल कायम
सरपंचपदासाठी मतमोजणीच्या सहा फेऱ्यापैकी सुरवातीच्या तीन फेऱ्यांत रेखा काळे या; तर नंतरच्या तीन फेऱ्यांत अलका कदम या आघाडीवर होत्या. सरतेशेवटी काळे यांनी वीस मतांनी निसटता विजय मिळविला. मात्र, त्याचवेळी कदम समर्थकांनी फेरमतमोजणीची मागणी केली. त्यामुळे तेथील निकाल राखून ठेवण्यात आला. चारही ग्रामपंचायतींच्या मतमोजणीनंतर सोनेसांगवी सरपंचपदाची फेरमतमोजणी घेण्यात आली. मात्र, त्यात काहीच बदल झाला नाही.