
काठापूरच्या सरपंचपदी सीमा थिटे
शिरूर, ता. २१ : शिरूर तालुक्यात चुरशीच्या ठरलेल्या काठापूर खुर्द ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विद्यमान सरपंच बिपिन थिटे यांच्या नेतृत्वाखालील मुक्ताईदेवी ग्रामविकास पॅनेलला सातपैकी केवळ दोन जागा मिळाल्या. मात्र, सरपंचपदी याच पॅनेलच्या सीमा बिपिन थिटे यांनी निसटता विजय मिळविला. राष्ट्रवादीअंतर्गत दोन गटात ही निवडणूक झाली.
काठापूरच्या सरपंचपदासाठी सीमा बिपिन थिटे विरुद्ध जय हनुमान ग्रामविकास पॅनेलच्या कांताबाई यशवंत दिघे यांच्यात सुरवातीपासूनच चुरस होती. प्रत्यक्ष मतदानातही ही चुरस कायम राहिली. ७३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यापैकी थिटे यांना ३७४; तर दिघे यांना ३६५ मते मिळाली. त्यामुळे थिटे यांना विजयी घोषित करण्यात आले.
या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या एकूण सातपैकी पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या. यशवंत दिघे यांच्या नेतृत्वाखालील जय हनुमान पॅनेलच्या राजश्री अजित कानसकर, शोभा संतोष लोंढे, अशोक बाळासाहेब दाते व सुनीता सत्यवान लोंढे यांची; तर मुक्ताईदेवी पॅनेलच्या सुजाता सोमनाथ होळकर यांची निवड झाली होती.
प्रत्यक्ष सदस्यपदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमधून राजाराम देवराम दाते, मच्छिंद्र बबन होळकर, रंगनाथ जिजाबा होळकर; तर प्रभाग क्रमांक तीनमधून विश्वनाथ वसंत जाधव आणि सोमनाथ किसन औटी यांच्यात लढत झाली. त्यात हनुमान ग्रामविकास पॅनेलचे राजाराम दाते; तर मुक्ताईदेवी पॅनेलचे विश्वनाथ जाधव हे विजयी झाले.