
नाताळच्या सोहळ्यात सर्वधर्मियांचा सहभाग
शिरूर, ता. २५ : झुमो नाचो खुशी से आज, येशू पैदा हुआ... प्रभू येशूची आम्ही लेकरे... टाळ्यांच्या गजर करीत ही आणि अशी अनेक गाणी गात, एकमेकांना केक व चॉकलेटचे वाटप करीत, फटाक्यांची आतषबाजी आणि चर्चवरील घंटानाद करीत शहर व परिसरातील ख्रिश्चन बांधवांनी आज (ता.२५) येशू जन्माचे उत्साहात स्वागत केले. ख्रिश्चन बांधवांच्या नाताळ सणाच्या सोहळ्यात सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते.
शहरातील या पुरातन चर्चची रंगरंगोटी करून परिसरात रोषणाई केली होती. आकाशदिव्यांनी चर्च सुशोभित केले होते. तसेच कमानी लावून परिसर सजविला होता. चर्चमध्ये येशू जन्माचा देखावा मांडला होता. त्याचबरोबरच ख्रिसमस ट्री मांडून त्यावर रोषणाई केली होती.
मराठी मिशनच्या ''रेव्हरंड ओझरो मेमोरियल सेवा चर्च'' मध्ये झालेल्या ख्रिसमसच्या सोहळ्यात बिशप बिपिन मसिह, बिशप संदीप विभुते, माजी नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांच्यासह ज्योती लोखंडे, विनोद भालेराव, मुजफ्फर कुरेशी, मंगेश खांडरे हे माजी नगरसेवक सहभागी झाले होते.
रेव्हरंड ओझरो मेमोरियल सेवा चर्चचे फादर नीलेश विभूते यांनी प्रार्थना म्हटल्यानंतर, उपस्थितांच्या हस्ते केक कापून तो लहान मुलांना वाटण्यात आला. चॉकलेट, इतर खाद्यपदार्थ व खेळणीही मुलांना वाटण्यात आली. यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात येशू जन्माचे स्वागत केले. मेरी ख्रिसमस व हॅप्पी ख्रिसमस म्हणून एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. जय गायकवाड यांनी स्वागत केले. सुषमा विभूते यांनी आभार मानले.
येशू ख्रिस्त हे प्रेम, शांती आणि करणेचे प्रतीक होते. संघर्षशील जीवनातही त्यांनी संयम कधी ढळू दिला नाही. प्रत्येकाने ख्रिस्ताशी म्हणजेच दया, करुणा, प्रेमाशी नाते जोडले तर समाजजीवन समृद्ध होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. प्रेम, येशू प्रत्येकाच्या हृदयात जागृत झाल्यास इतरांचा नाश करण्याचा विचार आपोआप निघून जाईल व विश्वात शांती नांदेल.
- बिपिन मसिह, बिशप
01559