शिरूरच्या शेतकऱ्यांना ‘पांढऱ्या सोन्याची’ भुरळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूरच्या शेतकऱ्यांना ‘पांढऱ्या सोन्याची’ भुरळ
शिरूरच्या शेतकऱ्यांना ‘पांढऱ्या सोन्याची’ भुरळ

शिरूरच्या शेतकऱ्यांना ‘पांढऱ्या सोन्याची’ भुरळ

sakal_logo
By

शिरूर, ता. ३० : शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आता जमिनीतून उगवणाऱ्या ढवळ्या सोन्याची भुरळ पडली आहे. सर्वसाधारणपणे विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशचीच मक्तेदारी असलेल्या कापसाच्या उत्पादनाकडे आता या दुष्काळी भागातील शेतकरी वळू लागला असून, तब्बल अडीचशे हेक्टरहून अधिक क्षेत्र या पांढऱ्या सोन्याच्या लागवडीखाली आले आहे. पुढील वर्षभरात (सन २०२३) हे क्षेत्र दुपटीहून अधिक होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.


लागवड क्षेत्रात वाढ
उसाचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात कापूस उत्पादनाचा प्रारंभ झाला असून तांदळी, बाभूळसर बुद्रूक, पिंपळसुटी या भागात तर उसाला फाटा देत अनेक शेतकऱ्यांनी कापूस उत्पादनावर भर दिल्याचे चित्र आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा व खानदेश हा कापूस उत्पादनाचा भाग समजला जातो. मात्र, गेल्या वर्ष - दोन वर्षांत शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही या पांढऱ्या सोन्याने भुरळ घातली आहे. कापूस लागवडीचे तंत्र, कीड नियंत्रण व त्यासाठी लागणारी औषधी, विक्रीसाठी जवळची बाजारपेठ आणि महत्त्वाचे म्हणजे उसाच्या तोडीस तोड बाजारभाव मिळू लागल्याने तालुक्याच्या पूर्व परिसराबरोबरच; अनेक भागांतून आता कापूस उत्पादन होऊ लागले आहे. त्यातून दिवसेंदिवस या भागात कापसाच्या लागवड क्षेत्रात वाढ होत असल्याचे चित्र आहे. कापूस उत्पादन आणि विक्री व्यवस्था याबाबत शेतकरी व विशेषतः शेतकरी कुटुंबातील तरुण आवर्जून माहिती करून घेताना दिसत आहे.

अर्थकारणाला चालना
सद्यःस्थितीत शिरूर तालुक्याच्या पूर्व भागाबरोबरच; इतर ठिकाणीही कापूस उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून, कापसाचे कधी नव्हे ते क्षेत्र हळूहळू वाढत चालल्याचे आशादायक चित्र आहे. यंदा तब्बल २५० हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी ‘सकाळ’ला दिली. कापसाच्या शेतीमुळे या भागातील अर्थकारणाला चालना मिळू लागली असून, कमी कालावधीच्या या नगदी पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळू लागल्याने नजीकच्या भविष्यात कापसाच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

परतीच्या पावसाचा फटका
कपाशी उत्पादनात आताशी कुठे शेतकरी रूळत असतानाच यंदा परतीच्या पावसाने या नव कापुसोत्पादकांना जरासा फटका दिला. या अस्मानी संकटाचा सामना करीत शेतकरी पांढरे सोने पिकविणाऱ्या काळ्या मातीत घट्ट पाय रोवून उभा राहिला. तरीही काही कापूस उत्पादकांचे नुकसान झाले. पावसाने इनामगाव येथील ३६ शेतकऱ्यांचे १६ हेक्टर, गणेगाव दुमालाच्या ४५ शेतकऱ्यांचे ११ हेक्टर, तांदळीतील ४७ शेतकऱ्यांचे दहा हेक्टर तर पिंपळसुटीच्या पाच शेतकऱ्यांचे दोन हेक्टर असे मिळून तालुक्यातील एकूण २७ हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचे नुकसान झाले. कृषी विभागाने या नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे केले आहेत.

विक्री व्यवस्था
शिरूर तालुक्यातील कापूस उत्पादकांना कपाशी विक्रीसाठी काष्टीची (ता. श्रीगोंदा) बाजारपेठ जवळ असून, तेथे नगरसह खानदेश, मराठवाडा भागातील काही शेतकरी कपाशी खरेदीसाठी येतात. शिवाय मिरजगाव येथेही कापड मिल असल्याने त्या मिलमार्फतही काही शेतकऱ्यांशी संपर्क झाला आहे. त्याचबरोबर काही व्यापारी तांदळी, बाभूळसर या गावात येऊन थेट खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांची सोय झाली आहे.

शिरूर तालुक्यातील कापसाचे क्षेत्र गावनिहाय पुढीलप्रमाणे...
तांदळी - ८२ हेक्टर
गणेगाव दुमाला- ७६ हेक्टर
इनामगाव- ४० हेक्टर
पिंपळसुटी- १३ हेक्टर
बाभूळसर बुद्रुक- १२ हेक्टर
शिरसगाव काटा- ९ हेक्टर


आंधळगाव- २ हेक्टर
शिंदोडी- १ हेक्टर
कोळगाव डोळस- १ हेक्टर
कुरुळी- १ हेक्टर
शिरूर ग्रामीण- १ हेक्टर

जमिनीची प्रत सुधारण्यास मदत
तालुक्याच्या पूर्व भागातील तांदळी येथील संतोष गदादे यांनी सर्वप्रथम चार वर्षांपूर्वी कपाशीचा प्रयोग केला. दहा एकरात कपाशी केलेल्या गदादे यांनी एकरी १५ ते वीस क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले असून उत्पादन वाढीसाठी ते विविध प्रयोग करतात. पारंपारिक उसाची शेती करणाऱ्या गदादे यांनी १८ महिन्यांच्या उसापेक्षा पाच- साडेपाच महिन्यांच्या कपाशीला प्राधान्य देताना उसाच्या तोडीस तोड उत्पन्न मिळवीत इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श घालून दिला. ते ऊस आणि त्यासोबत कांदा उत्पादन घ्यायचे. परंतु, या दोन्ही पिकांना द्याव्या लागणाऱ्या आडमाप पाण्यामुळे जमिनीत क्षाराचे प्रमाणे वाढले. त्यामुळे पुढे उसाचे उत्पादन कमी निघून प्रतवारीही खराब होऊ लागली. वारंवार तीच ती पिके घेऊन जमिनीचा पोतही बिघडत चालला होता. केवळ पिकामध्ये फेरपालट करण्याच्या उद्देशाने त्यांनी कापसाची निवड केली. कापूस हे खोल मुळीचे पीक असून, लांब मुळ्यांमुळे जमिनीमधील क्षार कमी करण्याची त्याची क्षमता आहे. कपाशीला पाणीदेखील कमी लागत असल्याने जास्त पाण्याने जमिनीची खालावलेली प्रत सुधारण्यास मदत झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पीक फेरपालटानंतर पुन्हा ऊस व कांदा घेतले असता उत्पादन वाढीबरोबरच महत्त्वाचे म्हणजे ही पिके निरोगी येऊ लागल्याचे त्यांनी सांगितले.


उसाचे पीक १८ महिन्यात एकदाच तर कापसाचे दोनदा घेता येते. उसाच्या मानाने कपाशी उत्पादनात कष्ट असले तरी सरासरी उत्पन्न उसापेक्षा सव्वा ते दीडपट सरस घेतले आहे.
-महादेव गुंड, कापूस उत्पादक शेतकरी, तांदळी

जूनमध्ये पाऊस होऊन गेला की आम्ही कापूस उत्पादन घेतो. उसापेक्षा अधिकचे उत्पादन देणारी कपाशी पूर्ण तयार झाल्यानंतर काढली की मध्ये कांदा, गहू देखील करतो. त्यातून अधिकचे उत्पन्न मिळते.
-शिवाजी हरिश्चंद्र जांभळकर, कापूस उत्पादक शेतकरी, उरळगाव

उसाच्या तुलनेत कपाशीतून तोडीस तोड उत्पन्न मिळविले असून, सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनीचा स्तर वाढत चालला आहे. कपाशीनंतर कांदा, गहू करता येत असल्याने उत्पन्नाची लेवल होते.
-बबन मारुती गागरे, कापूस उत्पादक शेतकरी, पिंपळसुटी


पाच - सहा वर्षांपूर्वी आम्ही काही शेतकरी ऊसतोड कामगारांच्या टोळ्या बघायला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे गेलो होते. तेव्हा तेथे कपाशीचे पीक पाहून आम्ही शिरूर तालुक्यात प्रयोग सुरू केला. तो यशस्वी झाला. तत्पूर्वी ऊस, कांद्यामुळे नापिक झालेल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी उडीद, मूग घ्यायचो. आता सर्रास कापूस घेत असून, इतर शेतकरीही अनुकरण करू लागले आहेत.
-महादेव गदादे, प्रयोगशील शेतकरी, तांदळी