महागणपतीचे मंदिर भाविकांनी फुलले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महागणपतीचे मंदिर भाविकांनी फुलले
महागणपतीचे मंदिर भाविकांनी फुलले

महागणपतीचे मंदिर भाविकांनी फुलले

sakal_logo
By

शिरूर, ता. १ : नवीन वर्षांची सुरवात श्रीगणेशाच्या दर्शनाने करण्याच्या अनेक भाविक भक्तांच्या संकल्पामुळे रविवारी (ता. १) नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रांजणगाव (ता. शिरूर) येथील महागणपती मंदिर दिवसभर गणेश भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘महागणपती मोरया’च्या गजराने मंदिर परिसर दणाणून गेला होता.
महागणपतीस पहाटे पाच वाजता अभिषेक घालण्यात आला. भरजरी वस्त्र लेवून सुवर्णहार व रत्नजडीत मुकुट परिधान केल्यानंतर महागणपतीचे मंगलरूप आणखीच मोहक दिसू लागले. नित्य पूजेनंतर मंदिर दर्शनासाठी खुले केले. त्याचवेळी दर्शनबारी फूल झाली होती. नवीन वर्षाचा पहिला दिवस, नाताळची सुटी आणि जोडून आलेल्या रविवारमुळे केवळ जिल्ह्याच्याच नव्हे; तर राज्याच्या विविध भागातून भाविक दर्शनासाठी आले होते. राज्याच्या विविध भागातील वाहनांनी मंदिराचा परिसर; तर भाविकांच्या गर्दीने सभामंडप व गाभारा गच्च भरला होता.
कोरेगाव भीमा येथील शौर्यदिनाच्या गर्दीमुळे नगरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक इतर रस्त्यांनी वळविण्यात आली होती. तरीसुद्धा शिरूरहून शिक्रापूरपर्यंत वाहतूक सुरळीत होती. त्यामुळे नगरसह मराठवाड्यातील भाविकांची अधिक गर्दी होती. पुणे शहरातील भाविकांची संख्या मात्र त्या तुलनेत कमी होती. कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणारे व येणारे अनेक बांधव व विशेषतः महिला महागणपतीच्या दर्शनासाठी आवर्जून थांबत होते.
महागणपतीची महापूजा करून दुपारी १२ वाजता महानैवेद्य दाखविण्यात आला. त्यावेळी श्री रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, ॲड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशेबनीस संतोष रणपिसे, पुजारी प्रसाद कुलकर्णी व मकरंद कुलकर्णी उपस्थित होते.
रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे व पथकाने सकाळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर कोरेगाव येथील बंदोबस्तासाठी सर्व पोलिस फौज रवाना झाल्याने आजच्या गर्दीचे नियंत्रण देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनीच केले.