शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करा

शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करा

शिरूर, ता. ३ : शिरूर, आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्राचा विचार करता झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यांत अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून जीवघेण्या हल्ल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे, शेतकरी, शेतमजूर यांच्यासह शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, रात्रीच्या वेळी शेतकऱ्याला आपल्या पिकांना पाणी देताना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेतीच्या वापरासाठी दिवसा आठ तास वीज मिळण्याची मागणी, मंचर बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी केली.
पिंपरखेड (ता. शिरूर) येथे पूजा जाधव या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर निकम यांनी घटनास्थळी भेट दिली. या भागातील जांबूत परिसरात तीन जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण असून, महावितरण व शासनाच्या माध्यमातून विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर या भागातील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात काम करताना वन्य प्राण्यांचा धोका संभवत असल्याने दोन महिन्यांच्या अनुषंगाने कृषी पंपासाठी आठ तासाऐवजी बारा तास सिंचनासाठी वीज उपलब्ध व्हावी, अशा प्रकारचे निर्देश शासनाने महावितरणला दिले असून महावितरण कंपनीने याबाबत वीज नियामक आयोगाची मान्यता घेऊन कार्यवाही करण्याबाबत सूचित केले आहे.
या बाबीचा विचार करता उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, जुन्नर या भागात बिबट्यांचे वास्तव्य आहे. या भागात ऊस शेतीने हजारो हेक्टर क्षेत्र व्यापले असल्याने मोठी लपण निर्माण होऊन अन्न पाण्याच्या शोधात बिबट्यांचा मुक्त संचार वाढल्याने पशुधनाबरोबरच मनुष्यावरील हल्ल्यांचे प्रमाण वाढते आहे. बिबटे आता शेतकऱ्यांच्या घरापर्यंत येऊन पोहचले आहेत. एखाद्या कुटुंबात अशा प्रकारचा प्रसंग ओढवल्यास शासनाकडून या कुटुंबाला मदत केली जाते, मात्र अशा प्रकारच्या घटना घडूच नये यासाठी वनविभागाने बिबटे जेरबंद करणे गरजेचे असून महावितरणने या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज दिल्यास अशा प्रकारचे जीवघेणे अनर्थ टाळण्यास मदत होईल. यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज देण्यासंदर्भात महावितरणसह शासनाने योग्य निर्णय घ्यावा; अन्यथा आपण थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचा इशारा देवदत्त निकम यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com