
निमोणे येथे वीस गाईंचा मृत्यू
शिरूर, ता. १० : निमोणे (ता. शिरूर) जवळील लाडवस्तीवरील भगवान महादेव लाड या शेतकऱ्याच्या गोठ्यातील गाई सातत्याने दगावत असून, गेल्या सहा महिन्यांत वीस गाई मृत्युमुखी पडल्या आहेत. दरम्यान, गाईंना कुणीतरी काहीतरी खायला घालून मारले असल्याची तक्रार लाड यांनी शिरूर पोलिसांकडे केली.
एकाच शेतकऱ्याच्या गोठ्यातील तब्बल वीस गाई दगावल्याचे समजताच पोलिसांनी गंभीर दखल घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस नाईक विशाल कोथळकर यांनी तातडीने लाडवस्तीवरील या गाईंच्या गोठ्याला भेट देऊन पंचनामा केला. त्यावेळी भगवान लाड यांनी त्यांच्या गोठ्यातील गाईंची माहिती देताना रात्रीच्या वेळेस कुणीतरी मुद्दामहून चाऱ्यातून गाईंना काहीतरी खायला घालत असल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार केली.
लाडवस्तीवर भगवान लाड यांचा जर्सी गाईंचा गोठा असून, ते गेल्या अनेक वर्षांपासून गोपालन करून दुग्धव्यवसाय करतात. दहा सप्टेंबर २०२२ रोजी रात्री त्यांच्या गोठ्यातील दोन गाई अचानक तडफडून मेल्या. त्यावेळी लंपी या रोगाचा प्रादूर्भाव सर्वत्र जाणवत असल्याने व फारसा संशय न आल्याने त्यांनी शवविच्छेदन न करता गाईंचे अंत्यसंस्कार केले. मात्र, त्यानंतरही वेळोवेळी त्यांच्या गोठ्यातील गाई दगावत राहिल्या. गुरुवारी रात्रीही एक गाय दगावल्याने त्यांनी शिरूर पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. गाईंना काहीतरी खाऊ घालून मारले जात असल्याची तक्रार त्यांनी केल्याने पोलिस तपासाची चक्रे वेगाने फिरली.
मृत्युमुखी पडलेल्या काही गाईंचे शवविच्छेदन केले असून, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत गाईंना विषबाधा झाली किंवा कसे याबाबतची स्थिती स्पष्ट होईल. त्यानुसार कारवाईची दिशा ठरवली जाईल, असे या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस नाईक कोथळकर यांनी सांगितले.