
शिरूर येथे शेतकऱ्यांसाठी आंदोलन
शिरूर, ता. २५ : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष व जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाच्यावतीने मंगळवारी (ता. २८) पुणे-नगर रस्त्यावरील न्हावरे फाटा (ता. शिरूर) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. रासप व जनता दलाच्यावतीने याबाबतचे निवेदन प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे, रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, महासचिव माउली सलगर आदी या आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती रासपचे तालुकाध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, सध्या शेतीमालाला बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर, श्रीगोंदा, पारनेर, दौड या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, गेली वर्षभर कांद्याचे बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. सध्या कांद्याच्या काढणीला सुरवात झाली असून, नवीन कांद्याला सुद्धा मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना वीज बिल, कर्ज माफ करणे गरजेचे आहे. तसेच, शिरूर तालुक्यात बिबट्याचे प्रमाण वाढले असून, गावोगाव बिबटे मनुष्य व पशुधनावर हल्ले करीत आहेत. त्यांना बिबट्यापासून संरक्षण मिळावे, यासाठी वन विभागाने कायमस्वरूपी प्रतिबंधक उपाययोजना करण्याची गरज आहे. बिबट्याच्या भीतीमुळे शेतीला दिवसा सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत वीज मिळावी, कांद्याला हमी भाव द्यावा, मेंढपाळांना चराऊ कुरणे द्यावेत, राज्यात विविध ठिकाणी मेंढपाळावर हल्ले होत असून, त्यांना संरक्षण मिळावे, आदी मागण्यांसाठी हा आंदोलन होत आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव खेडकर, रासपचे नेते रामकृष्ण बिडगर, शिरूर-आंबेगाव विधानसभा अध्यक्ष किरण शिंदे, युवक आघाडीचे अध्यक्ष किरण शेडगे, उपाध्यक्ष संताजी तिखोळे आदी उपस्थित होते.