शिरूरमधील ओढ्यात मेलेल्या माशांचा खच

शिरूरमधील ओढ्यात मेलेल्या माशांचा खच

शिरूर, ता. २८ : शिरूर शहरातील मंगलमूर्ती नगर परिसरातील ओढ्यातील मासे गेल्या चार-पाच दिवसांपासून मरत असून, ओढ्याकिनारी मेलेल्या माशांचा खच पडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रांजणगाव एमआयडीसीतील काही कंपन्यांतून थेट या ओढ्यात सोडलेल्या केमिकलयुक्त पाण्यामुळेच हे मासे मृत्युमुखी पडल्याचा आरोप स्थानिक नागरीकांनी केला.
शिरूर शहर व शिरूर ग्रामीण यांना जोडणाऱ्या खारा ओढा परिसरात महाजन मळा व परिसरातील शेतीच्या पाण्यासाठी या ओढ्यावर मोठा बंधारा बांधण्यात आला आहे. त्यामुळे या ओढ्याला भरपूर पाणी आहे. बंधाऱ्यात साठलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मासे होते. परंतु, गेल्या चार-पाच दिवसांपासून या ओढ्याच्या पाण्यातील मासे मृत्युमुखी पडत असून, ओढ्याकिनारी मेलेल्या माशांचा खच पडला आहे. हे मेलेले मासे खाण्यासाठी बगळे, कावळे व इतर पक्षांचे थवे ओढ्याकिनारी घिरट्या घालीत असून, मेलेल्या माशांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष अनिल डांगे व सामाजिक कार्यकर्ते सावळेराम आवारी यांनी शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, मनसे जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे यांच्यासह या स्थितीची पाहणी केली. ओढ्यातील पाण्यावर हिरवा, पिवळा तवंग आला असून, पाणी मोठ्या प्रमाणात तेलकट झाले आहे. या पाण्यावर जलपर्णीही वाढली असून, त्यावरही मेलेले मासे तरंगत असल्याचे आवारी यांनी सांगितले.

रांजणगाव एमआयडीसीतील अनेक कंपन्यांतून रात्रीच्या वेळी या ओढ्याला केमिकलयुक्त पाणी सोडले जाते. त्यामुळे ओढ्यातील पाणी दूषित झाले असून, त्यामुळेच मासे मृत्युमुखी पडले आहेत. परिसरातील पाळीव जनावरे याच ओढ्याचे पाणी पितात. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहू शकतो. याच ओढ्याचे पाणी पुढे घोडनदीला मिळते. त्यामुळे पुढे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न उभे राहू शकतात. याबाबत एमआयडीसीला निवेदन दिले असून, केमिकलयुक्त पाण्याचा त्वरित बंदोबस्त करावा. अन्यथा स्थानिक नागरीकांना सोबत घेऊन जनआंदोलन उभे केले जाईल.
- अनिल डांगे, अध्यक्ष, आम आदमी पक्ष, शिरूर शहर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com