
शिरूरमधील केंद्रांवर भरारी पथकाचा ‘वॉच’
शिरूर, ता. २ : तालुक्यात दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १४ केंद्र असून, तेथून सहा हजार १८ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. कॉपीमुक्त परीक्षा अभियानांतर्गत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने भरारी पथक तयार केले असून, हे पथक परीक्षा काळात परीक्षा केंद्रांवर वॉच ठेवणार आहे.
शिरूर येथील विद्याधाम प्रशाला या केंद्रावर ६६३ विद्यार्थी परीक्षा देत असून, गुरुवारी सकाळी परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रशालेच्या प्रवेशद्वारावर मुख्याध्यापक प्रकाश कल्याणकर, विद्याधाम पालक संघाचे अध्यक्ष रावसाहेब चक्रे यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. शिक्रापूर केंद्रावर सर्वाधिक ८७० विद्यार्थी असून, केंदूर केंद्रावर सर्वात कमी १०२ विद्यार्थी परीक्षा देत आहेत, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी दिली. त्यांनी उपपरीक्षक जिजाबापू गट, सहायक परीरक्षक श्रीकांत निचित यांच्यासह शिरूर, कर्डे व इतर केंद्रांना भेटी देऊन परीक्षा व्यवस्थेची पाहणी केली.
शिरूर शहरातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ५०७, न्हावरे येथे ५५२, मलठण ४९९, कोरेगाव भीमा ३११, जातेगाव ३३७, तळेगाव ढमढेरे ५२७, वडगाव रासाई ३२६, करडे ४३८, निमगाव ३१३, टाकळी हाजी ३५८ व मांडवगण फराटा केंद्रावर २१८ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
टाकळी हाजी येथील बापूसाहेब गावडे विद्यालयातील परीक्षा केंद्रावर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनिता गावडे व घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे यांनी विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. केंद्राध्यक्ष आर. बी. गावडे, दत्तात्रेय मुसळे, अजय शिंदे, बाबाजी रासकर, दत्तात्रेय शिंदे, सुरेश शिंदे, सतीश फिरोदिया, मिलन मिसाळ आदी यावेळी उपस्थित होते.