
रांजणगावातील कामगाराचे चौथ्या दिवशीही उपोषण सुरू
शिरूर, ता. २ : रांजणगाव एमआयडीसीतील ‘बेकार्ट इंडस्ट्रीज प्रा. लि.’ या कंपनीसमोर उपोषणाला बसलेल्या औदुंबर काशीद या बडतर्फ कामगाराच्या उपोषण आंदोलनाच्या चौथ्या दिवशी काही कामगार संघटनांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
‘बेकार्ट’मध्ये आठ वर्षे कायम कामगार असलेल्या काशीद यांच्यावर, क्वालिटी चेकींगदरम्यान, व्यवस्थापनाने गैरवर्तणूकीचा ठपका ठेवून सन २०१५ ला बडतर्फ केले. याबाबत त्यांनी कामगार न्यायालयात कंपनीविरुद्ध दावा दाखल केला. पण गेले सात वर्षे ठोस निर्णय न झाल्याने आणि कौटुंबिक स्थिती हलाखीची होत चालल्याने त्यांनी २७ फेब्रुवारीपासून कंपनीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, कामगार न्यायालयातील कंपनीविरुद्धचा आपला खटला चालूच असून, त्यात कंपनीच्या बाजूने निकाल लागल्याची कंपनी व्यवस्थापनाने दिलेली माहिती खोटी असल्याचा दावा काशीद यांनी केला.