
महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
शिरूर, ता. ७ : रांजणगाव (ता. शिरूर) येथे महागणपती मंदिराच्या आवारात होलिकोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ''होळी रे होळी, पुरणाची पोळी'' बरोबरच ''मंगलमूर्ती मोरया, महागणपती मोरया'' अशा गजराने मंदिर परिसर दणाणून गेला.
सणानिमित्त पहाटे पाच वाजता महागणपतीला अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. रविवार, सोमवार अशा जोडून सुट्या आल्याने भाविकांची महागणपतीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती. भाविकांसाठी महाप्रसादाबरोबरच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, अशी माहिती श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी दिली. होळीनिमित्त दुपारी बारा वाजता महापुजेनंतर महागणपतीस महानैवेद्य दाखविण्यात आला.
सायंकाळी साडेसहा वाजता मंदिर परिसरात शास्त्रशुद्ध पद्धतीने व मंगल स्रोतांच्या निनादात होळी रचली. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त ओमकार देव यांनी होळीची विधीवत पूजा केली. देवस्थानचे उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर, राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रेय पाचुंदकर आदी यावेळी उपस्थित होते. पुजारी प्रसाद कुलकर्णी व मकरंद कुलकर्णी यांनी या सोहळ्याचे पौरोहित्य केले. त्यानंतर उपस्थितांच्या हस्ते होळी पेटवली.