
शिरूरमध्ये सव्वा कोटीची वीजचोरी उघडकीस
शिरूर, ता. १२ : ‘महावितरण’च्या पुणे येथील भरारी पथकाने केलेल्या कारवाईत शिरूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथे सुमारे सव्वा कोटी रुपये किमतीच्या विजेची चोरी उघडकीस आली. शिरूर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
भरारी पथकाचे प्रमुख अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेंद्र भागवत रडे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून किरण हनुमंत जासूद रवींद्र हरिश्चंद्र जासूद व नीलम जगन्नाथ जासूद (तिघे रा. चव्हाणवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याविरूद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
किरण जासूद यांनी एक जानेवारी २०१८ पासून ६२ महिन्यात पाच लाख सहा हजार ४७ युनिट, रवींद्र जासूद यांनी एक ऑक्टोबर २०१८ पासून ५३ महिन्यात दोन लाख १४ हजार ११७ युनिट; तर नीलम जासूद यांनी एक मे २०२२ पासून दहा महिन्यात ४५ हजार ९७६ युनिटची चोरी केल्याचे महावितरणच्या भरारी पथकाच्या कारवाईत निष्पन्न झाले. चोरलेल्या युनिटच्या आधारे १३ फेब्रुवारी रोजी तिघांना मिळून सुमारे एक कोटी २७ लाख ५९ हजार ४८० रुपयांची बिले महावितरणने दिली होती. परंतु, संबंधितांनी ती भरणे नाकारल्याने महावितरणकडून शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
वीजचोरीचे प्रकार टाळले जावेत, यासाठी यापुढेही भरारी पथकाची कारवाई चालू राहील. घरगुती किंवा वीजपंपासाठी अधिकृत कनेक्शनची मागणी आल्यास ‘महावितरण’कडून तातडीने कनेक्शन दिले जाते. परंतु, आकडा टाकून वीजचोरी करण्याची प्रवृत्ती चुकीची असून, या वीजचोरीचा ताण अधिकृत वीजग्राहकांवर येतो. हे टाळण्यासाठी कुठे वीजचोरी होत असेल तर महावितरण ला कळवावे. संबंधितांची नावे गुप्त ठेवली जातील.
- नरेंद्र रडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण, पुणे विभाग