सविंदणे येथील बछडे पुन्हा आईच्या कुशीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सविंदणे येथील बछडे पुन्हा आईच्या कुशीत
सविंदणे येथील बछडे पुन्हा आईच्या कुशीत

सविंदणे येथील बछडे पुन्हा आईच्या कुशीत

sakal_logo
By

शिरूर, ता. २१ : सविंदणे (ता. शिरूर) येथील लंघेमळ्यात आईपासून दुरावलेले चार बछडे अखेर रात्रीच्या काळोखात सोमवारी (ता. २०) पुन्हा आईच्या कुशीत विसावले. आई आणि पिलांची ताटातूट झाल्याने बछडे भेदरले होते, तर बिबट मादी देखील सैरभैर होऊन परिसरात डरकाळ्या फोडत फिरत होती. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अनेकांनी हा थरार अनुभवला आणि बिबट मादी पिलांना घेऊन जातानाचे हेलावून टाकणारे दृश्यही पाहिले.
लंघे मळ्यातील पंढरीनाथ धोंडीबा लंघे यांच्या उसाच्या फडात गेल्या दोन दिवसांपासून चालू असलेल्या भीती, उत्सुकता अन वात्सल्याचा या खेळावर सोमवारी रात्री पडदा पडला. बिबट मादी आपल्या चार बछड्यांसह या फडाच्या एका सरीत वास्तव्याला होती. दरम्यान, ऊसतोड चालू झाल्याने निवारा हिरावला जाण्याच्या आणि बछड्यांच्या सुरक्षेकरीता बिबट मादीने डरकाळ्या फोडत ऊसतोड कामगारांवर रविवारी सायंकाळी हल्ला केला होता. मात्र, वेळीच सर्व ऊसतोड मजूर फडातून बाहेर पळाल्याने अनर्थ टळला. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी याच उसाच्या फडात चार बछडे आढळून आले. त्यामुळे मादीही याच परिसरात असेल या धास्तीने परिसरात भितीचे वातावरण पसरले. ऊसतोडीचे कामही ठप्प झाले.
दरम्यान, शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनपाल गणेश पवार, वनरक्षक ऋषिकेश लाड, रेस्क्यू मेंबर हनुमंत कारकूड व शौकत शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन हे चारही बछडे ताब्यात घेतले. त्यांना पुन्हा आईकडे सोडविण्यासाठी सोमवारी सायंकाळपासूनच रि युनियन ऑपरेशन राबविण्यात आले. त्यानुसार दोन छोट्या लोखंडी बास्केटमध्ये हे बछडे ठेवले व दोन्ही बास्केट जेथे हे बछडे सापडले होते, त्याच परिसरात ठेवण्यात आल्या. रात्री हे ऑपरेशन राबवीत असतानाच उसाच्या फडातून बिबट्याच्या गुरगूरण्याचा आवाज येत होता. सव्वानऊच्या सुमारास बिबट मादीने बास्केटमधील एकेका पिल्लाला तोंडात धरून सुरक्षितस्थळी हलविले. वनविभागाचे हे रि युनियन ऑपरेशन अनेकांनी उसाच्या फडापासून काही अंतरावर थांबून प्रत्यक्ष अनुभवले. मादी चारही बिबट्यांना घेऊन गेल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.

एक ते दीड महिन्यांच्या चार बछड्यांची मातेपासून ताटातूट झाली होती. त्यामुळेच मादी बिबटही सैरभैर झाली होती. त्यातूनच ती ऊसतोड मजुरांवर धावून गेली. तथापि, बछड्यांशी भेट झाल्याने ती शांत होईल, असा अंदाज आहे. तरीही परिसरातील लोकांनी खबरदारी घ्यावी. मादी किंवा बछडे कुठे आढळून आल्यास वनखात्याशी संपर्क साधावा.
- मनोहर म्हसेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरूर