पूर्वजांच्या आठवणीने गहिवरले मुस्लिम बांधव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूर्वजांच्या आठवणीने गहिवरले मुस्लिम बांधव
पूर्वजांच्या आठवणीने गहिवरले मुस्लिम बांधव

पूर्वजांच्या आठवणीने गहिवरले मुस्लिम बांधव

sakal_logo
By

शिरूर, ता. २२ : काल रात्री चॉंद दिसल्यानंतर, गेले महिनाभराच्या रोजाची (उपवास) सांगता झाली व आज मुस्लिम बांधवांनी रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. ईदगाह मैदानावरील सामूहिक नमाज पठणानंतर, मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होते. नमाज पठणानंतर येथील कब्रस्तानमध्ये पूर्वजांना आदरांजली वाहताना वातावरण भावूक झाले. पूर्वजांच्या आठवणींनी अनेकांना गहिवरून आले.
सकाळी, इस्लामचा ध्वज घेऊन जुलूस निघाला. हा जुलूस ईदगाह मैदानावर पोचल्यावर तेथे सामुहीक नमाज पठण झाले. त्यावेळी अबालवृद्ध मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमाज पठणानंतर विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. मौलाना कैसर फैजी व मौलाना आरिफ यांनी ईदचे महत्त्व विशद केले. ईद हा आनंदाचा व उत्साहाचा सण असला तरी तो परोपकार शिकवतो. जे लोक परिस्थितीमुळे हा आनंद साजरा करू शकत नाहीत, त्यांना जकातरूपाने आपल्या उत्पन्नातील काही वाटा देत आपल्या बरोबर घ्यावे हा संदेश देतो, असे कैसर फैजी म्हणाले. नमाज पठण हा केवळ विधी नाही; तर ती जीवन जगण्याची पद्धती आहे, असे मौलाना आरिफ म्हणाले. पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी यावेळी आवर्जून उपस्थित राहात मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. गुलाबाचे फूल देत सर्वांचे स्वागत केले. सामुहीक नमाज पठणानंतर, मुस्लिम बांधवांनी गळाभेट घेत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
मुस्लिम जमातचे अध्यक्ष इक्बालभाई सौदागर, माजी नगराध्यक्ष नसीम खान, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, कार्याध्यक्ष हाफीज बागवान, भाजप अल्पसंख्याक आघाडीचे तालुका संघटक एजाज बागवान, शहर अध्यक्ष हुसेन शहा, कॉंग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष अजिम सय्यद, माजी नगरसेवक आबिद शेख, हाजी मुश्ताक शेख, रफीक शेख, बादशाह मणियार, मुदस्सर सौदागर आदी यावेळी उपस्थित होते. अल मदद बैतुलमाल कमिटीचे अध्यक्ष फिरोज बागवान यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
दरम्यान, शहरातील मदिना, जामा, क्वार्टर गेट, बकर कसाब, मखतब या मशिदींमध्ये व हल्दी मोहल्ल्यातील मदरशामध्ये ईदनिमित्त सामुहीक नमाज पठण करण्यात आले. मुस्लिम बांधवांच्या घरोघर दिवसभर रंगलेल्या इफ्तार पार्टीत मित्रमंडळी व सर्वधर्मीय नागरीकांनी शिरखुर्मा, शेवई व गुलगुल्यांचा आस्वाद घेतला.