
सरदवाडी येथे घरासमोरून दुचाकीची चोरी
शिरूर, ता. २५ : सरदवाडी (ता. शिरूर) येथून एका घरासमोरून दुचाकी चोरीला गेली.
दत्तात्रेय गंगाराम सरोदे (रा. सरदवाडी, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी अज्ञात दुचाकी चोराविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदवाडी गावठाणात सरोदे हे राहावयास असून, रविवारी रात्री कामावरून आल्यानंतर त्यांनी आपली ज्युपिटर दुचाकी (क्र. एमएच १२ पीजे ५३८४) ही घरासमोर लावली. पहाटे साडेपाचच्या सुमारास फिरायला जाण्यासाठी ते घराबाहेर आले असता त्यांना त्यांची दुचाकी दिसली नाही. दिवसभर शोध घेऊनही दुचाकीचा तपास न लागल्याने आज त्यांनी शिरूर पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दिली. दरम्यान, सरदवाडी व परिसरात गेले काही महिने भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, गेल्या महिनाभरात दुचाकी चोरीची ही तिसरी घटना असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. सरदवाडी हे पुणे - नगर महामार्गावरील गाव असल्याने चोर चोरी करून लगेचच वाहनातून पसार होतात. त्यासाठी या परिसरात पोलिस गस्त वाढविण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.