
शेतकऱ्यांच्या समस्या बांधावर जाऊन ऐका
शिरूर, ता. ११ : आगामी खरीप हंगाम यशस्वी करताना कृषी व इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावू नये, तर शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्या बांधावर जाऊन ऐकून घ्याव्यात. माझ्यासह इतर लोकप्रतिनिधीही याकामी पुढाकार घेतील, अशी अशी ग्वाही आमदार ॲड. अशोक पवार यांनी तालुकास्तरीय नुकत्याच झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत दिली.
पुणे जिल्हा परिषद, शिरूर पंचायत समिती व राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने शिरूर येथे आयोजित बैठकीत आमदार ॲड. पवार बोलत होते.
पेरणीनंतर महिनाभरात शेतकऱ्यांना खते हवी असतात. पण ती वेळेवर मिळत नाही. इतर अनावश्यक खते घेण्याची सक्ती केली जाते. हे दरवेळच्या खरीप हंगामातील गाऱ्हाणे थांबणार आहे की नाही, असा संतप्त सवाल आमदार ॲड. पवार यांनी केला.
यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी अजित देसाई, निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रा.भाऊसाहेब भोसले आदी उपस्थित होते.
ग्राहक पंचायतीचे शिवाजी खेडकर, तुकाराम निंबाळकर, संतोष दौंडकर, नाना फुलसुंदर, बबन सोनवणे यांनी यावेळी विविध सूचना मांडल्या. तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी प्रास्ताविकात खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा घेतला. कृषी सहायक जयवंत भगत यांनी सूत्रसंचालन केले. सहायक गटविकास अधिकारी राम जगताप यांनी आभार मानले.
प्रत्येक गावात कृषी भवन असावे, अशी आपली संकल्पना असून, त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा चालू आहे. तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी याठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन करतील, असे अपेक्षित आहे. त्यातून प्रशासन शेतकरी समाजाशी निगडित राहून त्यांच्या समस्या, अडचणी समजून घेऊ शकतील. शेतकरी वर्गाला विविध विषयांच्या मार्गदर्शनासाठी ही कृषी भवने उपयुक्त ठरतील.
- ॲड. अशोक पवार, आमदार, शिरूर - हवेली.
पीक स्पर्धांतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान
शासनस्तरावर घेण्यात आलेल्या विविध पीक स्पर्धांतील विजेत्या शेतकऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तालुकास्तरीय स्पर्धेतील यशस्वी शेतकरी : सोपानराव गवारे, सिंधूबाई थिटे, मोहनराव सोनवणे, राजाराम काळे, धनिष्ठा म्हेत्रे, संदीप सुक्रे, महादेव गायकवाड, कलावती मासाळकर, शिवराम सुक्रे, संपत गव्हाणे, विश्वनाथ भागवत, निवास साकोरे, ज्ञानेश्वर गायकवाड, दत्तात्रेय इचके, लक्ष्मण निचित.
जिल्हास्तरीय स्पर्धेतील यशस्वी शेतकरी : भाऊसाहेब पळसकर, संभाजी भगत, अविनाश लंघे, माणिक कुसेकर, शिवाजी भागवत, राजेंद्र भुजबळ.
-------------------------------------------