चव्हाणवाडी गावाचा बदलला चेहरा-मोहरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चव्हाणवाडी गावाचा बदलला चेहरा-मोहरा
चव्हाणवाडी गावाचा बदलला चेहरा-मोहरा

चव्हाणवाडी गावाचा बदलला चेहरा-मोहरा

sakal_logo
By

शिरूर, ता. १४ : राज्य शासनाच्या आर. आर. (आबा) सुंदर गाव पुरस्कार योजनेत, शिरूर तालुक्यातील चव्हाणवाडी गावाने जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविल्याने गावात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. एकमेकांना पेढे भरवून ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. जिल्हास्तरीय यशाबद्दलचे चाळीस लाख तर तालुकास्तरीय पहिल्या क्रमांकाचे दहा लाख असे तब्बल पन्नास लाख रुपयांचे बक्षिस या पुरस्कारातून गावाला मिळणार असल्याने विकासकामांना आणखी चालना मिळणार आहे.
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कारासाठी सन २०२१ - २२ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील तीन गावांचा समावेश होता. या योजनेच्या सर्व निकषात सरस ठरल्याने चव्हाणवाडीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला. यासाठी स्वच्छता, व्यवस्थापन व दायित्व हे मुख्य निकष होते. या निकषांची अंमलबजावणी करताना गावाचा चेहरा - मोहरा बदलून गेला असून, विविध विकास कामांतून व कल्पक नियोजनातून गावाचं रूपडं बदललं आहे. या पुरस्काराचा आनंद साजरा करताना आज गावात पेढे वाटण्यात आले. सरपंच संतोष लंघे, उपसरपंच जयश्री लोखंडे, ग्रामसेवक विकी पोळ तसेच वैभव जगदाळे, अक्षय बांदल, महेंद्र जासूद, स्वाती हराळे, प्रभावती गरुड, शोभा मोहिते हे ग्रामपंचायत सदस्य व कैलास लंघे, भर्तरीनाथ पवार व सुरेखा कर्डिले हे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र जासूद, विस्तार अधिकारी संजय शिंदे, तत्कालीन ग्रामसेवक सारीका दरेकर, प्रेरक वक्ते उमेश कणकवलीकर, शिरूर तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष रमेश जासूद, चव्हाणवाडी सोसायटीचे अध्यक्ष संदीप लंघे, माजी सरपंच किरण चव्हाण, माजी उपसरपंच अशोक चव्हाण, चंद्रकांत वाळके, राजू लोखंडे, सुरेश हराळे यांच्यासह ग्रामस्थांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व योगदान लाभल्यानेच गावाला हा पुरस्कार मिळू शकला अशी प्रतिक्रिया सरपंच संतोष लंघे यांनी व्यक्त केली.


गावात झालेला आमूलाग्र बदल
-वैयक्तिक शौचालयाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण
-सांडपाणी व्यवस्थापनासाठी बंदीस्त गटार योजना
-पाणी गुणवत्ता तपासणीत गावाला चंदेरी कार्ड प्राप्त
-घनकचरा व्यवस्थापनांतर्गत गावात २२ कचरा कुंड्या
-ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून संकलन
-प्लॅस्टिकबंदीत तालुक्यात अग्रक्रम
-ग्रामपंचायतीचे सर्व कामकाज शंभर टक्के ऑनलाइन
-शासनाच्या विविध योजनांबरोबरच ग्रामपंचायतीच्या
खर्चाचा ताळेबंद ग्रामस्थांना व्हॉटस ॲपवर पाठविला जातो.

साडेतीन हजार वृक्षांची लागवड
ग्रामपंचायत कार्यालयाच्या अद्ययावत इमारतीबरोबरच प्राथमिक शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी नव्याने उभी राहिली. सर्व इमारतींवर अपारंपरिक ऊर्जेचा (सौर) वापर केला असून, ग्रामपंचायतीजवळ इलेक्ट्रीक दुचाकी चार्जिंगसाठी पॉइंट काढला आहे. ही सुविधा विनामूल्य आहे. गावातील अंतर्गत सर्व रस्ते कॉंक्रीटचे केले असून, रस्त्याच्या दुतर्फा सुमारे साडेतीन हजार वृक्ष लावले आहेत.

सीएसआरमधून उभारले दहा बंधारे
गाव व परिसरातील ओढ्या - नाल्यांवर फियाट इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या सीएसआर फंडातून दहा बंधारे उभारले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही गावाचा परिसर हिरवागार दिसून येतो. केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास, रोहयो, जनधन, अटल पेन्शन व सुकन्या समृद्धी योजनेचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केले.

आरोग्याबाबत जागृती
आरोग्याबाबत जागृत झालेल्या चव्हाणवाडीत लहान मूल, गरोदर माता, ज्येष्ठ नागरिकांची आठवड्यातून एकदा तपासणी केली जाते. २३ बचत गटांतून ३७५ महिला संघटित झाल्या आहेत. डाळ मिलबरोबरच त्यांनी मशरूम उत्पादन, शेळीपालन, कुक्कुटपालन व इतर लघु उद्योग सुरू केले आहेत.
गेले सात वर्षे घरपट्टी व पाणीपट्टीसह शंभर टक्के करवसुली होते. गावात छोटेखानी वाचनालय असून, ते ग्रामस्थांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. मागासवर्गीय कल्याण, महिला व बालकल्याण, दिव्यांगांसाठी शंभर टक्के निधी खर्च झाला आहे.

गावातील अनेक ज्येष्ठांचे, आजी - माजी पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, शिक्षक, आरोग्य सेवकांचे सल्ले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामान्य ग्रामस्थांचे योगदान यातून या जिल्हास्तरीय पुरस्कारापर्यंत गावाला धडक मारता आली. राज्य शासनाच्या या योजनेत सहभाग नोंदवतानाच ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद व सक्रिय सहभाग दाखविला. त्यामुळेच या छोट्याशा वाडीचा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात लौकिक पसरला.
-संतोष लंघे, सरपंच, चव्हाणवाडी (ता. शिरूर)


2389
02391