पिंपरखेडमध्ये दोन ठिकाणी जबरी चोरी

पिंपरखेडमध्ये दोन ठिकाणी जबरी चोरी

शिरूर, ता. १८ : तालुक्याच्या बेट भागातील पिंपरखेड येथील दाभाडेमळा परिसरात गुरुवारी (ता. १८) पहाटे पाचच्या सुमारास दोन ठिकाणी जबरी चोरीचा प्रकार घडला. चौघांच्या टोळक्याने कोयता, गलोर व दांडक्याचा धाक दाखवीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे पावणेसहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. यात दोन ज्येष्ठ महिलांना मारहाण केली.
प्रदीप बाळू दाभाडे (रा. दाभाडेमळा-पिंपरखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप दाभाडे यांच्या घराचा दरवाजा पहाटेच्या सुमारास चार ते पाच चोरांनी जोरात ढकलल्याने कडी निघाली व ते आत घुसले. चोरट्यांच्या आवाजाने दाभाडे पती-पत्नी जागे झाले. चोरट्यांनी त्यांना कोयता व गलोरचा धाक दाखवून पूजा दाभाडे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. कटावणीने कपाटाचे लॉकर तोडून कपाटातील दागिणे दागिने व रोख रक्कम, असा पाच लाख साठ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
प्रदीप दाभाडे यांच्या शेजारील एका खोलीत त्यांचे भाऊ राहुल दाभाडे, आतेभाऊ नीलेश डुकरे, भावजय अनुजा दाभाडे हे, तर दुसऱ्या खोलीत त्यांचे वडील बाळू दाभाडे, आई अरुणा दाभाडे हे झोपले होते. चोरट्यांचा आवाज ऐकून ते जागे झाले व मदतीसाठी त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या खोल्यांना बाहेरून कड्या लावलेल्या होत्या. त्यांच्या मदतीसाठीच्या आरडाओरड्याने चोरट्यांनी त्यांच्या खोल्यावर दगड फेकले व त्याचवेळी गोठ्यात झोपलेल्या प्रदीप यांच्या आजी शांताबाई नावजी दाभाडे यांना हाताने मारहाण करीत त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले. जाताना त्यांनी प्रदीप दाभाडे यांच्या घराजवळील एका घरालाही लक्ष्य केले. तेथे अंजनाबाई धोंडिभाऊ दाभाडे यांना मारहाण करून त्यांच्या घरातील कपाटातून रोख रक्कम व कर्णफुले, असा १७ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला.
चार ते पाच संख्येने असलेले चोरटे २५ ते तीस वयोगटातील होते व त्यांनी काळ्या रंगाची पॅंट आणि टी शर्ट घातलेले होते, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे, पोलिस हवालदार विशाल पालवे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी सापडलेल्या वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या. ठसेतज्ज्ञांकडून त्यावरील ठसे प्राप्त केले आहेत. श्वानपथकामार्फतही चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com